Press "Enter" to skip to content

खारघरमधील पाणी प्रश्नी नगरसेविका नेत्रा पाटील यांच्या शिष्ट मंडळाने घेतली सिडको सहव्यवस्थापकीय संचालकांची भेट !

पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खारघर नोडमधील पाणी प्रश्न दिवसांगणिक गंभीर बनत आहे. कमी दाबाने मिळणाऱ्या पाण्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. खारघर प्रभाग ४ मधील पाण्याची समस्या अत्यंत गंभीर असून मागील दोन वर्षांपासून सदर प्रश्न प्रलंबित आहे. सिडको प्रशासनाने याबाबत गांभीर्य दाखवून येथील पाणी समस्या तातडीने सोडवावी, अशी मागणी स्थानिक नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी सिडको प्रशासनाकडे केली आहे. खारघरमधील पाणी प्रश्नाबाबत नेत्रा पाटील यांच्या शिष्ट मंडळाने नुकतीच सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. कैलास शिंदे यांची भेट घेतली.

खारघर प्रभाग क्रमांक ४ मध्ये सुमारे एक लाख एवढी लोकसंख्या आहे. मात्र, मागील दोन वर्षांपासून येथे पिण्याचे पाणी अतिशय कमी प्रमाणात मिळत आहे. प्रामुख्याने या विभागातील सेक्टर १३ , १९,२० आणि सेक्टर २१ मध्ये पाणी प्रश्न अतिशय गंभीर आहे. याबाबत सिडकोचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता यांना वारंवार निवेदन देऊन, पाठपुरावा करून देखील पाणी प्रश्न सुटला नसल्याची खंत नगरसेविका नेत्रा पाटील यांनी व्यक्त केली. अखेर शुक्रवारी सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. कैलास शिंदे यांची भेट घेऊन खारघर मधील पाणी प्रश्नांची गंभीरता मांडल्याचे नेत्रा पाटील यांनी सांगितले. यावेळी समाजसेवक किरण पाटील, भाजप खारघर उपाध्यक्ष दिलीप पाटील , रहिवाशी संतोष नायर, अरुणा शेलार, रणजित चौधरी, गायकवाड आदी उपस्थित होते.
दरम्यान, खारघर मधील पाणी प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्याचे आश्वासन यावेळी डॉ. कैलास शिंदे यांनी यावेळी दिले. खारघरमध्ये पाणी समस्या असताना जर पिण्याचे पाणी उद्यान किव्हा बांधकाम ठिकाणी दिले जात असल्यास ते तातडीने बंद करून खारघर मधील नागरिकांना पुरेसा पाणी पुरवठा करावा, असे आदेश करण्याचे आदेश डॉ. कैलास शिंदे यांनी यावेळी पाणी पुरवठा विभागाला दिले.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »