नवी मुंबई : कोविड काळात रुग्णांना सेवा देणाऱ्या खारघर येथील निरामय हॉस्पिटलने खारघर येथे कोविड १९ लसीकरण केंद्र सुरू केले आहे. खारघर सेक्टर ७ येथील लँडमार्क बिल्डिंगमध्ये सदर लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे.
नमो नमो भारतचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा दी लँडमार्क सोसायटीचे सेक्रेटरी आर के दिवाकर यांच्या शुभहस्ते लसीकरण केंद्राचे उदघाटन करण्यात आले. यावेळी निरामय हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ अमित थडानी, लँडमार्कचे व्यवस्थापक यासिन खान, सुपरवायझर विशाल कुमार, डॉ हितेश कुमार दिवाकर आदी उपस्थित होते.
खारघर येथे लँडमार्क बिल्डिंगमध्ये पुढील तीन महिने हे कोविड लसीकरण केंद्र सुरू राहणार आहे. नागरिकांच्या सेवेसाठी रविवारी देखील लसीकरण होणार असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्या, कोरोनापासून स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला सुरक्षित करावे, असे आवाहन आर के दिवाकर यांनी केले.
दरम्यान, कोविड लसीकरणाला गती देण्यासाठी शासनाने खाजगी रुग्णालयांना परवानगी दिल्या आहेत. त्याअनुषंगाने खारघर येथे कोविड लसीकरण केंद्र सुरू केल्याची माहिती निरामयचे डॉ अमित थडानी यांनी दिली. सदर केंद्रावर कोव्हक्सीन ही लस उपलब्ध असून नागरिकांनी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ अमित थडानी यांनी केले आहे.






