नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवी मुंबई जिल्हा युवक अध्यक्ष राजेश भोर यांना आपल्याकडे खेचल्यानंतर राष्ट्रवादीचा तुर्भे गड फोडण्याचा भारतीय जनता पक्षाने केलेला डाव फसला. राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश करण्याच्या तयारीत असलेल्या पदाधिकाऱ्यांवर अगोदरच शिस्तभंगाची कारवाई करून राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबई जिला अध्यक्ष अशोक गावडे यांनी त्यांचे निलंबन करून त्यांचे मनसुबे धुळीला मिळविले.
तुर्भे तालुका अध्यक्ष बाळकृष्ण खोपडे यांनी राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी देण्यासाठी काही कार्यकर्त्यांची रविवारी तुर्थे येथे बैठक लावली होती. तुर्भे येथील पदाधिकारी व काही कार्यकर्ते भाजपात जाण्याच्या तयारीत होते. याबाबतची माहिती राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस मल्लिकार्जुन पुजारी यांना कळताच त्यांनी तत्काळ राष्ट्रवादीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे व अन्य वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना माहिती दिली. याबाबत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेत तुर्भे तालुका अध्यक्ष बाळकृष्ण खोपडे यांची पक्षाच्या शिस्तभंगामुळे त्यांच्या पदावरून त्यांना आज तडकाफडकी निलंबित करण्यात करण्यात आल्याचे जिल्हा अध्यक्ष अशोक गावडे यांनी सांगितले. तुर्भे तालुका कार्यकारिणी देखील बरखास्त करण्यात येत असल्याचे देखील अशोक गावडे यांनी स्पष्ट केले.





