Press "Enter" to skip to content

पार्थ फाऊंडेशनच्या वतीने ३११ जणांना कोरोना लस !

नवी मुंबई : कोरोनाविरुद्धच्या लढ्याला आणखी बळकटी यावी, यासाठी राज्य सरकार कसोशीने प्रयत्न करीत आहे. आपली आरोग्य यंत्रणा अथक परिश्रम घेत आहे. शहरी भागांत तसेच गाव पातळीवर कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस वेळोवेळी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. सरकारच्या ह्या प्रयत्नांना पाठबळ म्हणून पार्थ पवार फाऊंडेशन या संस्थेने सहकारी सायरस होशांग जाल यांच्या मदतीने कोरोना लसीकरणाची विशेष मोहीम हाती घेतली. या मोहिमेंतर्गत चार दिवसात एकूण ३११ जणांना कोरोनाची लस टोचण्यात आली. पारशी जनरल हॉस्पिटलमध्ये ही मोहीम यशस्वीपणे राबवण्यात आली.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण, हाच एकमेव पर्याय आजच्या घडीला समोर आहे. त्यामुळे देश पातळीवर लसींचा तुटवडा जाणवत असला तरी, राज्य पातळीवर स्वतंत्रपणे लस विकत घेऊन ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याची राज्य सरकारची तयारी आहे. ह्या नाजूक काळात लसीकरणाची निकड समजून घेत पार्थ पवार फाऊंडेशन संस्थेने आपले सहकारी सायरस होशांग जाल यांच्या सहकार्याने मुंबईतील पारशी जनरल हॉस्पिटल येथे विशेष लसीकरण मोहीम राबवली. या मोहिमेला पहिल्या दिवसापासून नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पहिल्या दिवशी ५० जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी १००, तिसऱ्या दिवशी ६० तर, शेवटच्या म्हणजेच चौथ्या दिवशी १०१ नागरिकांना कोरोना लस टोचण्यात आली. अशा पद्धतीने एकूण ३११ जणांना विशेष मोहिमेंतर्गत मोफत लसीकरणाचा लाभ घेता आला.

दरम्यान, कोरोना संकट काळात अशा पध्दतीची समाजोपयोगी मोहीम राबवल्याबद्दल नागरिकांनी पार्थ पवार फाऊंडेशन संस्थेचे आभार मानले. त्याचप्रमाणे समाजभान राखून यांसारख्या मोहिमांना चालना देणारे युवानेते पार्थदादा पवार यांच्याप्रती सुद्धा नागरिकांनी कृतज्ञता व्यक्त केली. या मोहिमेत पारशी जनरल हॉस्पिटलमधील डॉक्टर व परिचारिकांनी मोलाची साथ दिली. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या नियमावलीनुसार लसीकरणापूर्वी नागरिकांची प्राथमिक माहिती गोळा करण्यापासून ते लस देण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया नियोजनबध्दपणे पार पडली. विनम्र वर्तणूक आणि उत्तम भूमिका बजावल्याने लसीकरणास आलेल्या नागरिकांनी डॉक्टर, परिचारिकांना धन्यवाद दिले.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »