पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खारघर हा सर्वात मोठा नोड असून येथे कोविड लसीकरण केंद्र वाढवावीत, अशी मागणी खारघरवासियांनी केली आहे. नागरिकांच्या वतीने राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या खारघर शहर अध्यक्षा राजश्री कदम यांनी पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांना मागणीचे निवेदन दिले आहे.
खारघर विभागात मोठी लोकवस्ती आहे. मात्र, फक्त एकच कोविड लसीकरण केंद्र सुरु आहे. खारघर सेक्टर १५ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या लसीकरण सुरु आहे. ४५ वर्ष वरील वयोगटातील लसीकरणाच्या मोठी गर्दी होत होती. आत १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण सुरु झाल्याने लसीकरण केंद्रावर आणखी गर्दी वाढत आहे. येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे खारघरमध्ये पालिकेने आणखी लसीकरण केंद्र सुरु करावे, खाजगी रुग्णालयांना लसीकरण केंद्र सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी राजश्री कदम यांनी केली आहे.
लसीकरण केंद्रात ४५ वर्ष वयोगटावरील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिकांसाठी लसीकरणासाठी वेगळा कक्ष करावा, अशी देखील राजश्री कदम यांनी मागणी केली आहे. खारघरमध्ये शाळा सध्या बंद आहेत त्या शाळेत लसीकर केंद्र सुरु करावीत, असे देखील राजश्री कदम यांनी पालिका प्रशासनाला सुचविले आहे.






