Press "Enter" to skip to content

खारघर येथे कोविड हॉस्पिटल सुरू करण्याच्या मागणीसाठी मनसेचे आमरण उपोषण !

पनवेल : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने खारघर येथे बांधलेल्या होमिओपॅथी हॉस्पिटलच्या इमारतीत तातडीने कोविड हॉस्पिटल सुरू करावे, या मागणीसाठी खारघर मनसेने आमरण उपोषणाचे शस्त्र उगारले. खारघर सेक्टर 18 येथील सदर हॉस्पिटलच्या आवारात मनसेने आमरण उपोषण सुरू केले आहे.

खारघर सेक्टर 18 येथे सिडकोने 20 कोटी रुपये खर्च करून सदर होमिओपॅथी हॉस्पिटल उभारले आहे.
मात्र, हॉस्पिटल सुरू न केल्याने सदर इमारत 2 वर्षांपासून बंद आहे. सध्या कोरोनाने उग्र रूप धारण केले आहे. खारघरची लोकसंख्या एक लाखाहून अधिक आहे. खारघर मध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बेड, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड मिळणे मुश्किल झाले आहे.खाजगी रुग्णालयात रुग्णांची मोठी आर्थिक लूट होत आहे. त्यामुळे
पनवेल मनपा प्रशासनाने खारघर येथील सदर बंद इमारतीत कोविड हॉस्पिटल सुरू करावे, अशी मागणी मनसेच्या वतीने मागील दोन महिन्यांपासून केली जात आहे. येथे कोविड हॉस्पिटल सुरू झाल्यास सुमारे 100 बेडची सुविधा उपलब्ध होऊ शकते. मात्र, पनवेल मनपा प्रशासन, सिडको प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे मनसेचे म्हणणे आहे. अखेर, खारघर मनसेने आजपासून आमरण उपोषण सुरू केले.

कोरोनाच्या महामारीत रुग्णांची सरकारी हॉस्पिटल मधील होणारी फरपट व खाजगी हॉस्पिटल मधील लूट थांबवण्यासाठी खारघर सेक्टर १८ येथील भूखंड क्रमांक ३८/३९ वरील हॉस्पिटल नागरिलांसाठी सुरु होईपर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा मनसेने दिला आहे.
उपोषणात मनसे खारघर शहर अध्यक्ष प्रसाद परब, उपाध्यक्ष गणेश बनकर, सचिव संतोष पंडित, सोशल विश्वास, आदर्श कांबळे, जयेश विसावे , प्रविण मोरे, विनोद साबळे ,ओंकार शिंदे तसेच खारघर मनसे महिला अध्यक्षा चंचला बनकर
महिला सचिव रिद्धी केणी, मनीषा घावट आदी सहभागी झाले होते.

आयुष मंत्रालयाची खारघर सेक्टर 18 येथील हीच ती बंद इमारत.
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »