पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील तळोजा विभागात लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पनवेल शहर जिल्हा कार्याध्यक्ष शहाबाज पटेल यांनी रायगड जिल्हा पालकमंत्री अदिती तटकरे यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन श्री पटेल यांनी पनवेल मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना देखील दिले आहे.
पनवेल मनपाच्या वतीने काही ठराविक केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. तळोजा फेज 1, फेज 2 हे मोठे नोड आहेत. तळोजा विभागाची लोकसंख्या लाखाच्या घरात आहे. मात्र, येथे कोविड बाबत कोणतीच सुविधा नाही. सध्या लसीकरण मोहीम सुरू आहे. मात्र, तळोजा विभागात मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असताना येथे लसीकरण केंद्र सुरू केलेले नाही. तळोजा जवळील खारघर नोड मध्ये लसीकरण सुरू आहे. मात्र, मर्यादित लसीकरण आणि नेहमीची गर्दी यामुळे तळोजामधील नागरिकांना येथे येऊन लसीकरणाला नंबर लावणे मुश्किल आहे. त्यामुळे तळोजा येथे लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी शहाबाज पटेल यांनी केली आहे. सध्या लसीची कमतरता असून लसीचा पुरवठा सुरळीत होण्यापूर्वी तळोजा येथे लसीकरण केंद्र सुरू करावे. त्यासाठी लसीकरण कक्ष, निरीक्षण कक्ष, नोंदणी कक्ष व नागरिकांसाठी बसण्याच्या व्यवस्थेसह लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी शहाबाह पटेल यांनी पालकमंत्री अदिती तटकरे व पनवेल मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.






