नवी मुंबई : सिडको महागृहनिर्माण योजना २०१८ -१९ मधील घरांचे (सदनिकांचे) हफ्ते थकीत असणाऱ्या तसेच ज्यांनी घरांचा एकही हफ्ता भरलेला नाही, अशा अर्जदारांना उर्वरित हफ्ते भरण्याकरिता ३१ जुलै २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सिडको महामंडळातर्फे घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या “सर्वांसाठी घरे” धोरणांतर्गत सिडकोतर्फे महागृहनिर्माण योजना २०१८ -१९ अंतर्गत नवी मुंबईतील तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली आणि द्रोणागिरी या ५ नोडमध्ये सुमारे २५ ,००० घरे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गट यांकरिता साकारण्यात आली होती. सदर योजनेची संगणकीय सोडत पार पडल्यानंतर, यशस्वी अर्जदारांच्या कागदपत्रांची छाननी करण्यात येऊन पात्र ठरलेल्या अर्जदारांना सदनिकेच्या किंमतीच्या रकमेचा ठराविक हफ्त्यांमध्ये भरणा करण्यासाठी वेळापत्रक देण्यात आले होते. परंतु तद्नंतर काही अर्जदारांनी एकाही हफ्त्याचा भरणा न केल्याचे तर काही अर्जदारांचे हफ्ते थकीत असल्याचे आढळून आले होते. सदर अर्जदारांच्या विनंतीवरून सदनिकेचे हफ्ते भरण्यासाठी २८ डिसेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु या अंतिम दिनांकापर्यंतही काही अर्जदार हफ्ते भरण्यास असमर्थ ठरले होते.
महामंडळाच्या गृहनिर्माण योजनेतील तरतुदींनुसार विहित मुदतीत हफ्ते न भरणाऱ्या अर्जदारांचे वाटपपत्र रद्द होऊ शकते; परंतु कोविड-१९ ची महासाथ व त्या अनुषंगाने लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. तसेच सदर योजनेतील सर्व अर्जदार हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणे, या बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून सिडको महामंडळाने सदनिकेचा एकही हफ्ता न भरलेल्या आणि उर्वरित हफ्ते थकीत असणाऱ्या संबंधित अर्जदारांना हफ्ते भरण्याकरिता ३१ जुलै २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्याच तसेच २५ मार्च २०२० ते ३१ जुलै २०२१ या कालावधीत थकीत हफ्त्यांवर लागू होणारे विलंब शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर अंतिम मुदतीपर्यंत संबंधित अर्जदारांनी थकित हफ्त्यांचा भरणा करावयाचा आहे. या निर्णयामुळे संबंधित अर्जदारांना निश्चितच दिलासा मिळणार आहे.
याकरिता संबंधित अर्जदारांनी सिडकोच्या www.cidco.maharashtra.gov.in या संकेस्थळास भेट देऊन, त्यावरील ऑनलाईन पेमेंट या टॅबचा वापर करून आपल्या थकीत हफ्त्यांच्या संपूर्ण रकमेचा भरणा ऑनलाइन पद्धतीने करावायाचा आहे. दिलेल्या मुदतवाढीचा संबंधित अर्जदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.
“महागृहनिर्माण योजना २०१८ -१९ मधील काही अर्जदारांनी एकही हफ्ता न भरल्याचे तर काही अर्जदारांचे उर्वरित हफ्ते थकीत असल्याचे आढळून आले आहे. कोविड-१ 9 मुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. या बाबीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून संबंधित अर्जदारांना थकीत हफ्ते भरण्याकरिता मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”
डॉ. संजय मुखर्जी
उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको





