नवी मुंबई : कोविड-१९ च्या महासाथीच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता समाजाप्रति आपले कर्तव्य बजावणाऱ्या कोविड योद्धे व पोलीसांसह अन्य गणवेशधारी कर्मचाऱ्यांकरिता सिडको महामंडळातर्फे एका विशेष गृहनिर्माण योजनेचा लवकरच प्रारंभ करण्यात येणार आहे. ‘बुक माय सिडको होम’ असे या योजनेचे नाव असून सदर योजने अंतर्गत नवी मुंबईतील तळोजा नोडमध्ये ३७०५ घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटांकरिता उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
समाजाच्या विविध आर्थिक स्तरांतील नागरिकांना परवडणाऱ्या दरातील घरे उपलब्ध व्हावीत याकरिता सिडको महामंडळ गेल्या पाच दशकांपासून सातत्याने गृहनिर्माण योजना राबवित आहे. विविध विकास प्रकल्प राबविताना सिडकोने नेहमीच व्यापक समाजहिताचा आणि समाजाप्रति योगदान देणाऱ्या घटाकांचा अगत्याने विचार केला आहे. याच दृष्टीकोनातून सन २०२० मध्ये सिडकोने पोलीस कर्मचाऱ्यांकरिता विशेष गृहनिर्माण योजना सुरू केली होती. कोविड-१९ महासाथीच्या काळात आपल्या प्राणांची पर्वा न करता कर्तव्य बजावणारे कोविड योद्धे तसेच पोलीसांसह अन्य गणवेषधारी कर्मचाऱ्यांप्रति कृतज्ञता म्हणून सिडकोने या वर्षी ३७०५ घरांची (सदनिकांची) नवीन गृहनिर्माण योजना आणली आहे.
या योजने अंतर्गत अर्जदारांना आपल्या पसंतीची सदनिका निवडून खरेदी करता येणार आहे. तसेच प्रत्येक सदनिकेकरिता कमाल ३ प्रतीक्षा याद्या व त्याचबरोबर सर्वसाधारण प्रतीक्षा यादीही असणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या २० मे २०२० रोजीच्या शासन निर्णयानुसार कोविड-१९ महासाथीच्या काळात रुग्ण सर्वेक्षण, रुग्णांचा माग काढणे, प्रतिबंध, चाचणी, उपचार आणि सहाय्यता उपक्रमांशी संबंधित शासनाच्या विविध विभागांतील कर्मचारी, कोविड संबंधी कर्तव्यावर असणारे आरोग्य कर्मचारी व अन्य कर्मचारी (जिल्हा प्रशासन, पोलीस, होम गार्ड, अंगणवाडी सेविका, वित्त आणि कोषागार, अन्न आणि नागरी पुरवठा, पाणी पुरवठा आणि स्वच्छता, घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचे नेमून दिलेले विविध विभागांचे कर्मचारी इ.) तसेच कोविड संबंधी कर्तव्यावर असणारे कंत्राटी/बाह्यकंत्राटी/रोजंदारी/तदर्थ/मानधन तत्त्वावरील कर्मचारी यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. याकरिता, या संदर्भात संबंधित कर्मचाऱ्यांकडे सक्षम अधिकाऱ्याकडून देण्यात आलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक असणार आहे.
योजनेशी संबंधित प्रक्रिया या ऑनलाइन पार पडणार असून याकरिता https://Bookmycidcohome.com आणि https://cidco.maharashtra.gov.in ही दोन संकेतस्थळे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसेच योजनेशी संबंधित सविस्तर माहिती सदर संकेतस्थळांवर लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल. तरी या योजनेचा अधिकाधिक कोविड योद्ध्यांनी आणि पोलीसांसह अन्य गणवेषधारी कर्मचाऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.
“समाजाच्या सर्व आर्थिक स्तरांतील नागरिकांना परवडणाऱ्या दरातील घरे उपलब्ध करून देण्याकरिता सिडको सदैव कटिबद्ध आहे. या वेळेस सिडकोने कोविड-19 महासाथीच्या काळात आपल्या जीवावर उदार होऊन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कर्तव्य बजावणाऱ्या कोविड योद्ध्यांकरिता एक विशेष गृहनिर्माण योजना आणली आहे. कोविड योद्ध्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता सिडकोतर्फे सदर गृहनिर्माण योजना साकारण्यात येणार आहे.”
डॉ. संजय मुखर्जी
उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको





