Press "Enter" to skip to content

रुग्णालयांचे ‘फायर सेफ्टी ऑडिट, ‘इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट’ करा : सतीश पाटील !

पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णालयांमध्ये ‘फायर सेफ्टी ऑडिट’, तसेच रुग्णालयातील वैद्यकीय विद्युत उपकरणांचे ‘इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट’ करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पनवेल शाहज जिल्हा अध्यक्ष तथा जेष्ठ नगरसेवक सतीश पाटील यांनी पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. सदर मागणीचे निवेदन श्री पाटील यांनी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे, रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी व नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंह यांना देखील दिले आहे.

नाशिक जिल्ह्यातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती होऊन व्हेंटिलेटरवरील २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेने सरकारी रुग्णालयांसह अन्य आरोग्य संस्थांमध्ये अतिदक्षता विभाग (आयसीयू), एचडीयू, एसएनसीयू, ऑक्सिजन युनिट, इतर कक्षांमध्ये असलेल्या विविध प्रकारच्या वैद्यकीय विद्युत उपकरणांचे इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट करून घेण्यात यावे. या उपकरणांच्या देखभालीसाठी बायोमेडिकल इंजिनीअर, एका कंपनीसोबत देखभाल दुरुस्तीबाबत करार करण्यात यावा, त्यानुसार सर्व उपकरणांचे ऑडिट करण्यात येऊन सर्व उपकरणांची दुरुस्ती प्राधान्याने करण्यात यावी. जिल्हा अग्निशमन प्राधिकरणांच्या मदतीने पालिका क्षेत्रातील सर्व रुग्णालयांमध्ये फायर सेफ्टीच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांचे फायर सेफ्टीबाबत प्रशिक्षण घेण्यात यावे; तसेच वर्षातून एकदा मॉक ड्रिल करण्यात यावी,अशी मागणी निवेदनात केली आहे .

आरोग्य संस्थांमध्ये (रुग्णालयात) आवश्यकतेनुसार सर्व ठिकाणी पुरेशा प्रमाणात आग प्रतिबंधक उपकरणे उपलब्ध असल्याची खात्री करून घ्यावी. आग प्रतिबंधक उपकरणे व कार्यप्रणाली कार्यान्वित असण्याबाबत सर्वतोपरी दक्षता घेण्यात यावी. आरोग्य संस्थांमध्ये गेल्या पाच वर्षांत झालेल्या आगीच्या घटनांविषयी संस्थानिहाय आढावा घेण्यात यावा , असे देखील सतीश पाटील यांनी निवेदनात नमूद केले आहे.

जेष्ठ नगरसेवक सतीश पाटील

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »