नवी मुंबई : कोविड – १९ चा प्रसार व लागण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सिडको भवन, रायगड भवन व सिडकोच्या अन्य कार्यालयांमध्ये मध्ये अभ्यागतांना आता नो एंट्री आहे. शासनाच्या पुढील आदेशापर्यंत हि प्रवेश बंदी राहणार आहे.
कोविड – १९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, राज्य शासनाच्या ब्रेक द चेन, या ४ एप्रिल रोजीच्या आदेशानुसार, सदर रोगाचा प्रसार टाळण्यासाठी शासनातर्फे विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शासकीय कार्यालयांमध्ये सर्व प्रकारच्या अभ्यागतांना ५ एप्रिल पासून तात्पुरती प्रवेशबंदी करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर सिडको महामंडळाच्या सर्व कार्यालयांमध्ये देखील अभ्यागतांच्या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी त्यांच्या प्रवेशावर शासनाच्या पुढील आदेशापर्यंत तात्पुरती बंदी आणली आहे.
सिडको महामंडळात सामान्य नागरिकांसोबतच इतर आस्थापना, एजन्सी व कंपनीतील अधिकारी त्याचप्रमाणे कंत्राटदार यांसारख्या अभ्यागतांचा वावर मोठ्या प्रमाणावर असतो. यातून सदर विषाणूचा संसर्ग व प्रसार वाढण्याची शक्यता आहे. यामुळे सर्व प्रकारच्या अभ्यागतांना सिडको भवन, रायगड भवन व सिडकोची अन्य सर्व कार्यालये येथे शासनाच्या पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
सर्व अभ्यागतांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी पुढील सूचनेपर्यंत सिडको भवन, रायगड भवन व सिडकोची अन्य कार्यालये येथे भेट देऊ नये. सदर अभ्यागतांना अतिशय तातडीचे काम असल्यास त्यांनी पत्रव्यवहार, दूरध्वनी, भ्रमणध्वनी, ईमेल अथवा मेसेजद्वारे संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्याशी संपर्क साधावा अशी नम्र विनंती करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे अभ्यागतांना ई-व्हिजिटर्स प्रणालीच्या माध्यमातून भेटता येऊ शकणार आहे. सदर प्रणाली सिडकोतर्फे विकसित करण्यात आली असून त्याविषयीची विस्तृत माहिती सिडको महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थाळावर प्रसिद्ध करण्यात येईल. अपवादात्मक परिस्थितीत ज्या अभ्यागतांना प्रत्यक्ष भेट घ्यायची असेल अशांचे आरटीपीसीआर टेस्टचे अहवाल निगेटीव्ह आल्यापासून केवळ ४८ तासांमध्येच त्यांना विभाग प्रमुखांकडून विशेष व्हिजिटर पास जारी करता येऊ शकतो. या व्यतिरिक्त वेगवेगळ्या व्हर्च्युअल प्रणालींद्वारेही अभ्यागतांना संबंधित विभागप्रमुखांना भेटता येणार आहे. यात प्रामुख्याने एम एस टीम्स, झूम, वॉट्सॲप व्हिडीओ, गुगल मीट यांसारख्या ॲप्सचा समावेश आहे. या ॲप्सद्वारे भेट घ्यायची असल्यास सदर ॲप्सचा तपशील सिडको महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अभ्यागतांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यासाठी ०२२ -६७९१८१०० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सिडको प्रशासनाने केले आहे.





