सिडकोने उभारलेल्या कोविड समर्पीत
केंद्राचे पनवेल मनपाकडे हस्तांतरण !
कोकण दर्पण ! कोकण LIVE
पनवेल : कोविडचे संकट खूप मोठे असून या संकटावर मात करण्यासाठी आपण सर्वांनी एक संघ म्हणून काम केले पाहिजे, राज्य शासनाच्या माध्यमातून आवश्यक त्या ठिकाणी सर्वोतोपरी मदत केली जाईल, कोणत्याही रूग्णाला बेड उपलब्ध नाही, अशी स्थिती निर्माण होऊ नये, कोणताही रूग्ण उपाचारविना राहू नये यासाठी सर्वांनी दक्ष राहिले पाहिजे, असे प्रतिपादन नगरविकास मंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. सिडकोने तयार केलेल्या कंळबोली येथील कोविड समर्पित आरोग्य केंद्राच्या पनवेल महानगरपालिकेला हस्तांतरण व लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. पालकमंत्री आदिती तटकरे यावेळी प्रमुख उपस्थित होत्या.
कळंबोली येथे सिडकोच्या माध्यमातून कोविड समर्पित आरोग्य केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. १२ अतिदक्षता बेडसह ६० ऑक्सीजन बेडची सुविधा या केंद्रात करण्यात आली आहे. या केंद्राचे पनवेल महानगरपालिकेकडे हस्तांतरण तथा लोकार्पण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल, आमदार निरंजन डावखरे, आमदार बाळाराम पाटील, आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते. कोविडच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्याच्या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन ऑनलाईन करण्यात आले होते.
मंत्री श्री. शिंदे म्हणाले, राज्यात कोविडचे रूग्ण वाढत आहेत, सर्वांनी काळजी घेणे आवश्यक असून पालिकेने लसीकरणाच्या मोहिमेला गती देणे आवश्यक आहे. ट्रेसिंग, ट्रॅकींग आणि टेस्टींगवर भर देऊन रूग्णसंख्या नियंत्रणात आणली पाहिजे. त्याचबरोबर घरी विलगीकरणात असलेल्यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे, हे रूग्ण सार्वजनिक ठिकाणी फिरणार नाहीत याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.
यावेळी पालकमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, सिडकोने उभारलेले हे आरोग्य केंद्र खूप गरजेचे होते. पनवेल महानगरपालिका क्षेत्राबरोबरच रायगड जिल्ह्यातील रूग्णांसाठीही या केंद्रामुळे दिलासा मिळाला आहे. कोविडची साथ ओसरल्यानंतर इतर आजारांसाठी या केंद्राचा उपयोग होणार आहे. महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल यांनी स्वागत करून कोविड सेंटरची निर्मिती केल्याबद्दल सिडकोचे आभार मानले. पनवेलमधील रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी पालिका आवश्यक त्या उपाययोजना करीत असून वाढत्या रूग्णसंख्येला आरोग्य सेवा मिळण्यासाठी अशा समर्पित केंद्राची आवश्यकता होती. यामुळे शहरातील रूग्णांना बेड मिळविताना अडचण येणार नाही.
आयुक्त सुधाकर देशमुख यांनी आभार मानले. सिडकोने कमी वेळेत अत्याधुनिक केंद्र उभारल्याने शहरातील रूग्णांसाठी याचा उपयोग होणार आहे. पालिका क्षेत्रात रूग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी पालिका खूप प्रयत्नशील असून या केंद्राचा वापर कमी व्हावा, हीच सर्वांची इच्छा आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी केले. यावेळी उपमहापौर जगदीश गायकवाड, स्थायी समितीचे सभापती संतोष शेट्टी, सभागृह नेते परेश ठाकुर, विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, नगरसेवक, नगरसेविका, महानगरपालिका व सिडकोचे अधिकारी- कर्मचारी आॅनलाईन उपस्थित होते.





