कोरोना उपचारादरम्यान नातेवाईकांना
करावी लागतेय धावाधाव !
कोकण दर्पण ! कोकण LIVE
पनवेल : पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात प्लाझ्मा बँकच्या अभावामुळे नागरिकांच्या आरोग्यावर मोठे संकट ओढवले आहे. रुग्णावर उपचार करताना डॉक्टरांकडून ज्यावेळेस प्लाझ्मा (रक्तद्रव) ची मागणी केली जाते त्यावेळेस रुग्णाच्या नातेवाईकांपुढे मोठा प्रश्न निर्माण होतो व त्यांची धावपळ सुरू होते. सदर प्रश्नांची गंभीरपणे दाखल घेऊन पनवेल महानगरपालिकेने प्लाझ्मा बँकची सुविधा सुरू करावी, अशी मागणी नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे.
पनवेल महानगरपालिका हद्दीत पुन्हा दिवसेदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोना संसर्गजन्य आजराच्या पार्श्वभूमीवर सदर आजारात एक चांगली उपचार पद्धती म्हणून प्लाझ्मा थेरपी उपयोगी पडत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मागील वर्षी सदर सुविधा पनवेल महनगरपालिकेच्या वतीने एम.जी.एम.हॉस्पिटल, कामोठे येथे उपलब्ध होती त्यामुळे रुग्णांना अथवा त्यांच्या नातेवाईक यांना सदर सुविधा सहज उपलब्ध होत होती.परंतु सध्यस्थितीत सदर सुविधा उपलब्ध नसल्यामुळे रुग्ण व नातेवाईक यांचे हाल होत आहेत. रुग्णावर उपचारा दरम्यान डॉक्टरांकडून ज्यावेळेस प्लाझ्मा (रक्तद्रव) ची मागणी केली जाते त्यावेळेस सदर नातेवाईकांच्या पुढे मोठा प्रश्न निर्माण होतो व त्यांची धावपळ सुरू होते. सदर प्लाझ्मा बँकची सुविधा ही तात्काळ सुरू करण्यात यावी, अशी मागणी नेत्रा पाटील यांनी केली आहे.





