कोकण दर्पण ! कोकण LIVE
पनवेल : पनवेल महानगरपालिकेतील बहुसंख्य भूभाग अद्यापि सिडकोत आहे. पनवेल महानगरपालिका स्थापनेनंतर पुढील पाच वर्षे जनतेवर कोणताही नवीन कर लादू नये, अशी ठाम मागणी विरोधी पक्ष म्हणून आम्ही मांडली आहे. मात्र, सत्ताधारी भाजपने जनतेवर मालमत्ता कराचे ओझे लादले आहे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सूरदास गोवारी यांनी सोमवारी पनवेल येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मांडली. मालमत्ता कराच्या मुद्यांवरून सत्ताधारी पक्षाचे काही नगरसेवक विरोधी पक्षातील नगरसेवकांबरोबर आवाज उठवतात म्हणजे नक्कीच हा प्रश्न गंभीर आहे, याकडे उपाध्यक्ष सूरदास गोवारी यांनी लक्ष वेधले.
पनवेल महानगरपालिकेतील मालमत्ता कराच्या मुद्यांवरून सत्ताधारी भाजपचा पाय खोलात गेला असून यातून कसंतरी डोकं वर काढण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजप करीत आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष तथा नगरसेवक सतीश पाटील यांनी यावेळी पत्रकार परिषदेत लगावला.मालमत्ता कराचा विषय पनवेल महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या अंगाशी आला आहे. महासभेत जास्त सत्ताधारीच बोलतात, विरोधकांना बोलू दिले जात नाही, असा आरोप यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष तथा नगरसेवक सतीश पाटील यांनी यावेळी केला. सत्ताधाऱ्यांनी महापौर व प्रशासनासोबत बसून प्रश्न सोडविले पाहिजेत, मात्र तसे न होता सभागृहात सत्ताधारीच अधिक प्रश्न मांडतात. मग, विरोधी पक्षांनी प्रश्न काय कराचे ? असा सवाल देखील सतीश पाटील यांनी केला. पनवेल महानगरपालिका म्हणजे ठेकेदारांचा अड्डा बनल्याची बोचरी टीका देखील सतीश पाटील यांनी यावेळी पत्रकार परिषदेत केली. ज्या सत्ताधारी नगरसेवकांना सभागृहात बोलता येत नाही म्हणून सत्ताधारी नगरसेवक आम्हाला प्रश्न मांडायला सांगतात, असे सतीश पाटील यांनी नमूद केले.
राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांचे पदावरून निलंबन केले आहे. ते सर्वजण राष्ट्रवादीचे सदस्य आहेत. त्यांनी पक्षात येऊन पक्षवाढीसाठी काम करावे, अशी भूमिका मांडत पक्षांतर्गत कारवाई केलेल्यांबाबत पक्षाचे नेते खासदार सुनील तटकरे व प्रशांत पाटील निर्णय घेतील असे देखील सतीश पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
मालमत्ता कर जरी धोरणात्मक बाब असली तरी अद्यापि सिडकोकडून पनवेल महापालिकेकडे हस्तांरणाच्या बाबी शिल्लक आहेत, अशी माहिती यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पनवेल शहर जिल्हा कार्याध्यक्ष शिवदास कांबळे यांनी पत्रकार परिषेदेत दिली. यावेळी राष्ट्रवादीचे पनवेल युवक अध्यक्ष प्रमोद बागल, कार्याध्यक्ष शहबाज पटेल, खारघर शहर महिला अध्यक्षा राजश्री कदम आदी उपस्थित होते.





