Press "Enter" to skip to content

पनवेल मनपाची गृहनिर्माण सोसायट्यांवर करडी नजर !

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती लपविणाऱ्या
सोसायटी पदाधिकाऱ्यांवर होणार कायदेशीर कारवाई !

कोकण दर्पण ! कोकण LIVE
पनवेल : आपल्या सोसायटीमध्ये कोरोना पॉझीटिव्ह रूग्ण नियमांचे उल्लंघन करताना दिसत असतील तर पालिकेशी संपर्क साधण्याचे आवाहन पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले आहे. असे रुग्ण आढळल्यास त्या रूग्णांवर पोलिस विभाग आणि पालिकेची संयुक्त कारवाई करण्यात येऊन इंडिया बुल्स येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये १४ दिवसांसाठी घेऊन जाण्यात येणार आहे. संबधित सोसायट्यांनी जर पालिकेला कळविले नाही तर अशा सोसायट्या व त्यांच्या पदाधिकाऱ्यांवरही नाइलाजाने कारवाई करणे भाग पडेल, असे देखील आयुक्त सुधाकर देशमुख यांनी स्पष्ट केलंय.

पनवेल महानगरपालिका हद्दीतील कोराना पॉझीटिव्ह रुग्ण बेजाबदारपणे घराबाहेर फिरताना दिसल्यास पालिकेच्यावतीने त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. नुकतेच खांदा कॉलनी येथील उमिया कृपा सोसायटी येथील चार कोरोना पॉझीटिव्ह रूग्ण बाहेर फिरत असल्याचे समजल्यांवर पोलिसांच्या मदतीने पालिकेने या रूग्णांना इंडिया बुल्स येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये हालविले. गेले काही दिवसापासून पनवेल पालिका हद्दीमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सातत्याने नागरिकांना कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी काळजी घेण्यास सांगत आहेत . वारंवार यासाठीच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. असे असताना देखील काही पॉझीटिव्ह रूग्ण घराबाहेर पडताना दिसत आहे. नुकतीच पालिकेची आणि पोलिस विभागाशी बैठक झाली असून या बैठकीमध्ये यापुढे आता कोरोनाशी संबधित कारवाई ही संयुक्तपणे केली जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोविड १९ गृहविलगीकरणातील रूग्णांसाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत .कोरोना संक्रमित रूग्णाची गृह विलगीकरणाची शिफारस करणाऱ्या खाजगी वैद्यकिय व्यावसायिकावर सदर रूग्णाचे आरोग्याची संपूर्ण जबाबदारी राहणार आहे . शिफारस केलेल्या डॉक्टरने रूग्णाची दैनंदिन तपासणी करणे बंधनकारक असेल. तसेच वेळावेळी महापालिकेच्या वैद्यकिय आरोग्य विभागास रूग्णाच्या आरोग्याची माहिती कळविणे बंधनकारक असेल. कोरोना संक्रमित रूग्णाने गृह विलगीकरणाचा पर्याय निवडतांना ज्या खाजगी वैद्यकिय व्यावसायिकाच्या पर्यवेक्षणाखाली उपचार घेणार असेल अशा डॉक्टरची माहिती महापालिकेस सादर करणे बंधनकारक असेल. रूग्णांच्या कुटूंबातील व्यक्तींनी किंवा सहवासीतांनी किंवा संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वत:ची कोरोना चाचणी रूग्ण पॉझीटीव्ह आल्यानंतर तात्काळ करून घ्यावी. तसेच त्यांनी ७ दिवस घरातच रहाणे बंधनकारक आहे. पहिल्या दिवशी जर चाचणी निगेटिव्ह आली असेल तर ५ व्या दिवशी आपली पुन्हा चाचणी करून घेणे आवश्यक आहे. वरील नियमांचे उल्लंघन केल्यास रूग्णाला महापालिकेच्या कोव्हीड केअर सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात येईल. तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. रुग्णाच्या हातावर गृह विलगीकरणाचा शिक्का वैद्यकिय अधिकारी, नागरी आरोग्य केंद्राने मारण्याच्या सूचना पालिका प्रशासनाने दिल्या आहेत.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »