नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि महाविकास आघाडीत घमासान सुरू असताना आता तिसऱ्या फळीतील पक्षांनी एकत्र मोट बांधून नवी मुंबई विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूकच्या मैदानात उतरण्याचा निर्धार केला आहे.
नवी मुंबई विकास आघाडीमध्ये शेतकरी कामगार पक्ष, रीपब्लिकन सेना, समाजवादी पार्टी, स्वराज इंडिया, रिपब्लिकन पक्ष, जनता दल, सोशलिस्ट पार्टी, कम्युनिस्ट पार्टी, मार्क्सवादी पार्टी, घर हक्क संघर्ष समिती, महाराष्ट्र हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र जनशक्ती सेना, वंचित समाज इंसाफ पार्टी तसेच अन्य सामाजिक संघटनांचा समावेश आहे. नवी मुंबई महापालिका निवडणुकीत १११ जागा लढण्याचा निर्धार नवी मुंबई विकास आघाडीने आज सीबीडी बेलापूर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे सचिव ऍड राजू कोर्डे समाजवादी पार्टीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अफसर इमाम, घर हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष हिरामण पगारे, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष खाजामिया पटेल, शेकापचे प्रा सुधाकर जाधव उपस्थित होते.
नवी मुंबई विकास आघाडीचा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यासाठी गुरुवारी ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात जाहीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्याला शेकाचे अध्यक्ष जयंत पाटील, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अबू आझमी, रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर उपस्थित राहणार आहेत.
कोकण दर्पण





