Press "Enter" to skip to content

मस्जिदला विरोध करणारे गणेश नाईकच होते -जितेंद्र आव्हाड यांचा टोला !

प्रतिक घोलप, नवी मुंबई : गणेश नाईक हे जातीवादी आहेत. नेरुळमध्ये मस्जिद बांधायला भूखंड मिळाला, मात्र कधी मस्जिद बांधून झाली नाही, मस्जिदला गणेश नाईक यांचाच विरोध होता, असा आरोप राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नेरुळ येथे केला.

सिवूडस दारावे येथील माजी नगरसेवक संदीप सुतार व माजी नगरसेविका सलूजा सुतार यांच्या वतीने नेरुळ येथे नागरी कामांचा शुभारंभ आणि महिलांचे हळदीकुंकू अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी नाईक कुटुंबियांवर जोरदार हल्ला चढविला. आगरी समाजाचे नाईकांना काहीही पडलेले नाही. आगरी समाज म्हणजे नाईक कुटुंब असे समजणारे आगरी समाजाचा काय विकास करणार? असा टोला आव्हाड यांनी लगावला. इतकी वर्षे नवी मुंबई महापालिकेची फक्त मलई खाण्याचे काम नाईकांनी केल्याचा टोला आव्हाड यांनी लगावला. नवी मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वतीने नेरुळ प्रभाग क्रमांक 92 मधून सलूजा सुतार आणि प्रभाग क्रमांक 99 मधून संदीप सुतार यांची उमेदवारी नक्की असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केले.
यावेळी राष्ट्रवादीचे नवी मुंबई प्रभारी तथा आमदार शशिकांत शिंदे यांनी नवी मुंबई महापालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकविण्याचा निर्धार व्यक्त केला.
महाविकास आघाडीत तिकीट वाटपात कोणताही गुंता होणार नाही, असा विश्वास शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी व्यक्त केला. यावेळी माजी खासदार आनंद परांजपे, राष्ट्रवादीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे, कोंग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, निरीक्षक प्रशांत पाटील, कांग्रेस नेते संतोष शेट्टी, नगरसेविका स्वप्ना गावडे आदी उपस्थित होते.
यावेळी डॉक्टर, पोलीस, सफाई कामगार, सामाजिक कार्यकर्ते आदी अनेक कोरोना योध्यानचा सन्मान करण्यात आला. अनेक महिलांना सन्मानित करण्यात आले.यावेळी महिलांचे अनेक कार्यक्रम संपन्न झाले.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »