पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : ( प्रतीक घोलप ) : केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या विविध योजना आपल्या प्रभागात प्रखरपणे राबविण्याच्या अनुषंगाने नगरसेविका संजना समीर कदम यांनी खारघर येथे आयोजित केलेल्या विशेष शिबिरात शेकडो नागरिकांनी लाभ घेतला.
खारघर प्रभाग ६ मधील सेक्टर १८ येथे तीन दिवशीय विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिराला आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे नेते बाळासाहेब पाटील यांनी भेट देऊन सदर उपक्रमाचे कौतुक केले. २२ जानेवारी ते २४ जानेवारी दरम्यान हे शिबिर खारघर सेक्टर १८, सुप्रीम टॉवर शॉप क्रमांक ४ मध्ये या शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आरोग्यदायी योजना, पंतप्रधान जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत, पंतप्रधान श्रम योगी मानधन योजना, प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान, डिजिटल लिटरसी आदी योजनांची माहिती देऊन त्या योजना लोकांपर्यंत पोहचविण्याचा नगरसेविका संजना कदम आणि भाजप युवानेते समीर कदम यांनी प्रामाणिक प्रयत्न केला. या शिबिरात शेकडो नागरिकांनी भेट देऊन सरकारी योजनांची माहिती करून घेतली व सदर योजनांचा लाभ मिळविण्यासाठी कार्यवाही केली. खारघर प्रभाग ६ मधील नागरिकांनी तसेच खारघरवासीयांनी संजना कदम व समीर कदम यांच्या सदर उपक्रमाबाबत विशेष आभार मानले.
कोकण दर्पण.





