Press "Enter" to skip to content

नवी मुंबई विमानतळाला बॅरिस्टर अंतुले यांचे नाव द्यावे – एमआयएम !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला रायगडचे सुपुत्र तथा माजी मुखमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले यांचे नाव द्यावे, अशी मागणी एमआयएमने केली आहे. सदर मागणीचे निवेदन ऑल इंडिया मजलिस ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शाहनवाज खान यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राज्याचे नगरविकास मंत्री, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालकांना दिले आहे.
बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले भारतामधील एक राजकारणी, केंद्रीय अल्पसंख्यांक कार्यमंत्री व महाराष्ट्राचे आठवे मुख्यमंत्री होते. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे सदस्य असलेले अंतुले मनमोहन सिंग केंद्र सरकारमध्ये २००६ ते २००९ दरम्यान पहिले केंद्रीय अल्पसंख्यांक कार्य मंत्री झाले होते. रायगड जिल्ह्याच्या आंबेत गावामध्ये जन्मलेल्या अंतुले ह्यांनी मुंबई विद्यापीठ व लंडन येथे शिक्षण घेऊन बॅरिस्टरची पदवी मिळवली. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये १९६२ सालापासून कार्यरत असलेले अंतुले १९६२ ते १९७६ दरम्यान विधानसभेचे सदस्य होते. १९७६ ते १९८० दरम्यान राज्यसभा सदस्य राहिल्यानंतर १९८० मध्ये अंतुले पुन्हा विधानसभेवर निवडून आले व जून १९८० ते जानेवारी १९८२ दरम्यान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर राहिले. १९८९ पर्यंत आमदार राहिल्यानंतर अंतुले ९ व्या लोकसभेवर निवडून गेले व १९९८ पर्यंत खासदारपदावर राहिले. अंतुले यांनी रायगड जिल्ह्यातील जनतेच्या सेवेत संपूर्ण आयुष्य खर्ची घातले आहे. सन २००४ साली ते पुन्हा १४ व्या लोकसभेवर निवडून आले. देशभरातील राजकारणात, समाजकारणात अखंडपणे अविरत असणारे अंतुले हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते. बॅरिस्टर ए आर अंतुले म्हणजे रायगड जिल्ह्याचा गौरव आहे. त्यामुळे नव्याने होणाऱ्या नवी मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळाला बॅरिस्टर अब्दुल रेहमान अंतुले यांचे नाव द्यावे, अशी भूमिका एमआयएमने मांडली आहे.

कोकण दर्पण

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »