नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : नवी मुंबईतील लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या साम्राज्यातील अडचणीत आणखी वाढ झाली आहे. वाशी नवी मुंबईतील आणखी दोन नगरसेवकांनी भाजपला सोडचिठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला. भाजपच्या वाशी येथील प्रभाग ६४ च्या नगरसेविका दिव्या गायकवाड आणि माजी नगरसेवक वैभव गायकवाड यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी आमदार शशिकांत शिंदे उपस्थित होते. दिव्या गायकवाड आणि वैभव गायकवाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.
नवी मुंबईत भाजपात आलेले अनेकजण शिवसेना, राष्ट्रवादीत परतले आहेत. सुरेश कुलकर्णी, संदीप सुतार यांनी भाजपला सोडल्यानंतर डिसेंबर मध्ये नवी मुंबईतील भाजपच्या नगरसेविका अपर्णा गवते आणि दिपा गवते यांनी शिवसेनेत प्रवेश केला. वर्षा निवासस्थानी झालेल्या प्रवेश सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे स्वागत केले. नगरविकासमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते. अपर्णा गवते या स्थायी समिती सभापती नवीन गवते यांच्या पत्नी आहेत. त्यांच्या शिवसेनाप्रवेशामुळे दिघ्यातून भाजपचा सुपडासाफ झाला असून गणेश नाईक यांना जोरदार धक्का बसला आहे. गणेश नाईक यांच्या मनमानी कारभारामुळे नवी मुंबईतील भाजपमधून जोरदार आऊटगोर्इंग सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
कोकण दर्पण वृत्तसेवा.





