पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : पनवेल महापालिका क्षेत्रातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी मनपा प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, बचत गटातील महिलांच्या स्वयंरोजगारासाठी सार्वजनिक बाजार ठिकाणी व्यवसायासाठी जागा आरक्षित करावी,अशी मागणी नगरसेविका हर्षदा अमर उपाध्याय यांनी शुक्रवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत केली.
महासभेत महिला बालकल्याण समिती अंतर्गत पनवेल महापालिका राबवित असलेल्या उपक्रमांचे हर्षदा उपाध्याय यांनी कौतिक केले. महिलांना खऱ्या अर्थाने सक्षम बनविण्यासाठी , त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी त्यांना प्रभावीपणे प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असल्याचे हर्षदा उपाध्याय यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.याबाबत हर्षदा उपाध्याय यांनी सूचना मांडली. बचत गटातील महिला सक्षमीकरण करणे, त्यासाठी त्यांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी विविध प्रशिक्षण दिले जाते. प्रामुख्याने बचत गटामध्ये सर्वसामान्य कुटुंबातील तसेच घरकाम करणाऱ्या महिलांचा , घरांतून छोटा- मोठा व्यवसाय करणाऱ्या महिलांचा जास्त समावेश असल्याचे हर्षदा उपाध्याय यांनी सांगितले. अशा महिलांना खरोखर त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी त्या महिलांना प्रशिक्षणाबरोबर रोजगार उपलब्ध करून देण्याची गरज आहे, त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करण्याची गरज आहे. अशा महिलांना प्रशिक्षण घेऊन व्यवसायासाठी दुकान भाड्याने घेणे, डिपॉझिट भरणे शक्य होत नाही. त्यामुळे प्रशासनाचा महिला सक्षमीकरणाचा उद्देश पूर होत नाही.सदर महिलांना खरोखरच मुख्य प्रवाहात आणायचे असेल तर पालिकेने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून बचत गटांतील महिलांसाठी पनवेल महानगरपालिकेच्या दैनंदिन बाजारात जागा आरक्षित करावी, अशी मागणी हर्षदा उपाध्याय यांनी यावेळी केली. याद्वारे खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणाचे पालिकेचे ध्येय पूर्ण होईल, असा विश्वास हर्षदा उपाध्याय यांनी व्यक्त केला. दरम्यान, पालिका प्रशासनाने यासाठी अनुकूलता दाखविली आहे.
कोकण दर्पण.





