नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्ताने नवी मुंबईत आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिरात ८० रक्तदात्यांची रक्तदान केले. राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस मल्लिकार्जुन पुजारी यांच्या पुढाकाराने सदर रक्तदान शिबिर संपन्न झाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसंपर्क कार्यालय, सनफ्लॉवरबिल्डिंग, प्लॉट क्रमांक ३९,सेक्टर २०, कोपरखैरणे येथे सदर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १० वाजून १० मिनिटांनी रक्तदान शिबिराची सुरुवात करण्यात आली. कळंबोली येथील एमजीएम हॉस्पिटल ब्लड बँकने रक्त संकलनासाठी सहयोग दिला. अशी माहिती शिवशरण मल्लिकार्जुन पुजारी यांनी पत्रकारांना दिली.
सध्या कोव्हीडचा काळ आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रक्ताची मोठी गरज भासत आहे. मात्र, रक्ताचा तुडवडा भासत असल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. हॉस्पिटलमध्ये काही दिवसच रक्त पुरवठा पुरेल इतकाच साठा उपलब्ध आहे, त्यामुळे युवकांनी आणि सामाजिक संस्थांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करावे, असे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर आयोजित केल्याची माहिती मल्लिकार्जुन पुजारी यांनी दिली. नवी मुंबईकरांनी आपली सामाजिक जबाबदारी समजून मोठ्या संख्येने रक्तदान शिबिराला प्रतिसाद दिला. नवी मुंबईतील ८० रक्तदात्यांनी रक्तदान करून शरद पवार यांना ८० व्या वाढदिवसाची मानवीय भेट दिली.
कोकण दर्पण.





