नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सहकार सेलच्या नवी मुंबई जिल्हा अध्यक्षपदी भोजमल पाटील यांची निवड करण्यात आली आहे. नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी शुक्रवारी भोजमल पाटील यांच्यावर जबाबदारी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेरुळ येथील नवी मुंबई जिल्हा कार्यालयात अशोक गावडे यांनी भोजमल पाटील यांना नियुक्तीपत्र दिले.
भोजमल पाटील हे शरद पवारांचे खंदे समर्थक असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाल्यापासून पक्षात सक्रिय आहेत. नेरूळ तालुका अध्यक्ष, तालुकाध्यक्ष युवक व काही दिवसांनी जिल्हा उपाध्यक्ष युवक अशी जबाबदारी संभाळली आहे. २००५ मध्ये नवी मुंबई मनपाची नगरसेवक पदासाठीची निवडणूक देखिल लढले आहेत.
जळगाव जिल्हा अमळनेर तालुका रामेश्वर मूळ गावी पंचायत समिती निवडणूक जिंकून २०१० साली भोजमल पाटील यांची सभापती पदावर वर्णी लागली. पुन्हा नवी मुंबईत सामाजिक कार्याला सुरुवात केली. आता पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. पक्षासाठी पूर्णवेळ काम करणार असून सहकार क्षेत्राचा सखोल अभ्यास करून पक्ष वाढीसाठी काम करणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी भोजमल पाटील यांनी व्यक्त केली.
कोकण दर्पण.





