Press "Enter" to skip to content

पांडवकडा येथे पर्यटन स्थळ विकसित करण्याच्या हालचालींना वेग !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : संजय महाडिक : पनवेल महापालिका क्षेत्रातील खारघर येथे असलेल्या पांडवकडा धबधब्याला पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याबाबतच्या हालचालींना वेग आला आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी गुरुवारी मंत्रालयात याबाबत बैठक घेतली.
पालकमंत्री अदिती तटकरे यांनी त्यांच्या मुंबई मंत्रालयातील दालनात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. पनवेल महापालिका क्षेत्रातील खारघर येथे असलेला पांडवकडा हा धबधबा प्राचीन आहे. वनसमृद्ध, निसर्गसंपन्न असलेल्या पांडवकडा धबधब्यावर पावसाळ्यात अनेक पर्यटक येतात. निसर्गाने दिलेल्या पांडवकडा सारख्या अनमोल खजिन्याचे संवर्धन मात्र केले जात नाही. येथे आलेल्या पर्यटकांच्या सुरक्षेचा कायम प्रश्न आहे, त्यांना पर्यावरणपूरक सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे प्रत्येक वर्षी येथे अपघात होऊन पर्यटकांचा मृत्यू होतो. आतापर्यंत अनेक पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे पांडवकडा धबधब्याचा विकास करावा, पांडवकड्याला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करावे, अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून सर्व स्थरातून होत आहे. यासाठी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी वारंवार पाठपुरावा आणि पत्रव्यवहार केला आहे. मागील महिन्यात राष्ट्रवादीचे खारघर शहर माजी अध्यक्ष बळीराम नेटके यांनी पालकमंत्री अदिती तटकरे यांची भेट घेतली. पांडवकडा धबधब्याबाबत निवेदन दिले. अदिती तटकरे यांनी तात्काळ दाखल घेत गुरुवारी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि पांडवकडा धबधबा विकासाबाबत आढावा घेतला.पांडवकडा येथे पर्यावरणपूरक सोयीसुविधा पुरवून, पर्यटकांची सुरक्षा लक्षात घेता पांडवकडा येथे पर्यटनस्थळ विकासआराखडा तयार करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.

कोकण दर्पण

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »