Press "Enter" to skip to content

नवी मुंबईतील ४५७ इमारती धोकादायक !

३० वर्षापेक्षा जुन्या इमारतींचे
स्ट्रक्चरल ऑडिट करा – आयुक्त अभिजीत बांगर !

नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील धोकादायक इमारतींचे सन २०२० -२०२१ या वर्षासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षणानंतर एकूण ४५७ इमारती धोकादायक इमारती म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत. दरम्यान, ३० वर्षापेक्षा जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आवाहन पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केले आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम चे कलम २६५ (अ) नुसार ज्या इमारतींचा वापर सुरू होऊन ३० वर्षापेक्षा अधिक काळ लोटला आहे, अशा इमारतींचे नवी मुंबई महानगरपालिकेकडे नोंदणी केलेल्या बांधकाम अभियंत्याकडून किंवा संरचना अभियंत्याकडून संरचना परिक्षण करून घेणे अनिवार्य आहे.

३० वर्षापेक्षा जास्त काळ हा इमारतीचा वापर किंवा इमारतीस भोगवटा प्रमाणपत्र (पूर्ण अथवा अंशतः) क्षेत्रफळ वापराखाली आणले गेले अशा दिवसापासून मोजावयाचा आहे. नेमलेल्या संरचना अभियंत्याने शिफारशी केलेली दुरूस्तीची कामे पूर्ण झाल्याचे व ते बांधकाम सुस्थितीत असल्याचे प्रमाणपत्र नवी मुंबई महानगरपालिकेकडे सादर करण्यात यावे. याप्रकारे संरचना परिक्षण करण्याचे उत्तरदायित्व जी संस्था, मालक, भोगवटादार पार पाडण्यास टाळाटाळ करतील त्यांना रूपये २५ हजार रक्कम अथवा सदर मिळकतीच्या वार्षिक मालमत्ता कराची रक्कम, यातील जी जास्त असेल, तितक्या रककमेचा दंड ठोठविण्याची तरतूद महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम ३९८ (अ) खाली अंतर्भूत करण्यात आलेली आहे.

३० वर्षापेक्षा जास्त काळ झालेल्या इमारतीचे संरचनात्मक परिक्षण ३१ डिसेंबर २०२० पूर्वी पूर्ण करून याबाबतचा अहवाल संबंधित विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी आणि सहाय्यक संचालक नगररचना, नवी मुंबई महानगरपालिका यांचेकडे सादर करावयाचा आहे. धोकादायक झालेल्या इमारतीचा, घराचा वापर केल्यामुळे जिवित व वित्त हानी होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी धोकादायक इमारतींचा, घरांचा रहिवास, वापर तात्काळ थांबवावा, असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात आले आहे. अन्यथा दुर्देवी अपघात घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबधितांची राहील, याची नोंद घेण्यात यावी असेही सूचित करण्यात आले आहे.

कोकण दर्पण.