Press "Enter" to skip to content

खारघर-तळोजामधील पाण्याचा प्रश्न सोडविणार – पालकमंत्री अदिती तटकरे यांचे आश्वासन !

पनवेल,कोकण दर्पण वृत्तसेवा : खारघर आणि तळोजा येथील पाण्याचा प्रश्न तातडीने सोडविणार, असे आश्वासन रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी दिले. येथील पाणी प्रश्नाबाबत खारघर व तळोजा येथील रहिवाशांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्ठमंडळाने भेट घेतली.

तळोजा व खारघर या ठिकाणी पाण्याच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. सदर पाणीपुरवठ्याची जबाबदारी सिडको प्रशासनाकडे आहे. एमआयडीसीकडून दररोज आठ एम एल डी पाणी सदर विभागासाठी सिडको प्रशासनाला दिले जावे, सिडको व एमआयडीसीमध्ये झालेल्या असे बाल्टर करारानुसार ठरले आहे. सिडको प्रशासकीय अधिकारी यांचे तसे म्हणणे आहे. परंतु एमआयडीसीकडून रोज सहा ते सात एम एल डी च पाणी सदर विभागाला दिले जाते. फार कमी दाबाने पाणी दिले जात असल्यामुळे विभागातील अनेक बिल्डींगला आठवड्यातील कित्येक दिवस पाणी मिळत नाही. त्याचा भयंकर त्रास रोजचाच होत आहे. जनता सिडकोला पाणी बिल भरते, त्यामुळे सिडकोला जाब विचारला असता एमआयडीसीकडून पुरेसे पाणी पुरवले जात नसल्याची सबब सांगितली जाते.
ही सर्व व्यथा घेऊन पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहसचिव प्रसाद पाटील, पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष मंगेश, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पनवेल शहर जिल्हा जिल्हाध्यक्ष सतीश पाटील ,कार्यकारी अध्यक्ष शिवदास कांबळे आणि महाराष्ट्र प्रदेश युवक सचिव संदीप म्हात्रे यांच्या शिष्ठमंडळाने पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे ही व्यथा मांडली. हा प्रश्न समजावून घेऊन आदिती तटकरे यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक व एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी यांच्याशी जिल्हाध्यक्ष सतीश पाटील व कार्याध्यक्ष शिवदास कांबळे यांच्यासमवेत बैठक लावून लवकरात लवकर हा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन शिष्टमंडळात दिले.

या शिष्टमंडळात मध्ये पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे कार्यक्षम मंगेश नेरुळकर, ज्येष्ठ नागरिक सेलचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब लबडे, पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष आर एन यादव, जिल्हा सहसचिव कृष्णा मर्ढेकर, राष्ट्रवादी काँग्रेस खारघर विभागीय अध्यक्ष सुरेश रांजवन, महेश राऊत व प्रदीप पाटील आदींचा समावेश होता.

कोकण दर्पण.