Press "Enter" to skip to content

धोकादायक इमारती ! नगरसेविका संजना कदम यांची आक्रमक भूमिका ! सिडको करणार वास्तुविहार, सेलिब्रेशन सोसायटीचे स्ट्रक्चर ऑडिट !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : खारघर येथील वास्तुविहार व सेलिब्रेशन रहिवासी सोसायट्यांच्या इमारती धोकादायक असल्याच्या नोटिसा पनवेल महापालिका प्रशासनाने बजावल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे आणि संभ्रमावास्थेचे वातावरण निर्माण झाले. अगदी दहा वर्षांच्या इमारती धोकादायक कशा, असा प्रश्न रहिवाशांनी उपस्थित केल्यानंतर स्थानिक नगरसेविका संजना समीर कदम यांनी आक्रमक भूमिका घेत सिडको आणि पनवेल मनपा प्रशासनाला जाब विचारला. अखेर, पालिका प्रशासनाला यु टर्न घ्यावा लागला असून खारघरमधील वास्तुविहार आणि सेलेब्रेशन सोसायट्यांच्या इमारतींचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याचे सिडको प्रशासनाने बुधवारी मान्य केले आहे.

आपल्या इमारती धोकादायक असून राहण्यास योग्य नाही, अशा नोटीसामुळे येथील लोकांना आश्चर्याचा धक्काच बसला. सिडकोकडून बांधण्यात आलेल्या दहा वर्षांच्या इमारती धोकादायक कशा होऊ शकतात,असा प्रश्न पडला. परंतु पनवेल महापालिकेच्या नोटीसचा आपण सर्व रहिवासी पाठपुरावा करूयात असे येथील रहिवाश्यांकडून एकमुखाने ठरविण्यात आले. नगरसेविका संजना समीर कदम यांनी पत्रव्यवहार करून या नोटीसाबाबत महापालिकेला विचारणा केली. पनवेल महानगरपालिकेच्या महासभेमध्ये हा विषय मांडला. त्या अनुषंगाने पनवेल महापालिकेने २१ सप्टेंबरला दुसरी नोटीस काढून इमारतींना दहा वर्ष पूर्ण झाली आहेत तरी प्रथमदर्शनी या इमारती सुस्थितीत असून आपण स्ट्रक्चर ऑडिट करून १५ दिवसात माहापालिकेला कळवावे असे सांगितले. प्रशासनाच्या अशा बेजबाबदारपणामुळे नागरिकानी संतापाची भावना व्यवक्त केली आहे.

दरम्यान, नगरसेविका संजना कदम यांनी सिडको प्रशासन व शिर्के इन्फ्रा लिमिटेड यांनी येथील रहिवासी सोसायटय़ांना मोफत स्ट्रक्चर ऑडिट करून देण्याची मागणी केली होती. सदर मागणी मान्य करत सदर बिल्डिंगचे स्ट्रक्चर ऑडिट करून देण्याचे मान्य केले आहे. आपल्या इमारती धोकादायक असून राहण्यास योग्य नाहीत या समस्येचा पाठपुरावा करण्याच्या दृष्टीने सिडको व्यवस्थापकीय संचालक यांना येथील रहिवासी सोसायट्या व नगरसेविका संजना कदम यांनी पत्र देऊन आंदोलन करण्याची भूमिका घेतल्यानंतर खडबडून जागे झालेल्या सिडको प्रशासनाने सोसायटी पदाधिकारी यांना मीटिंग बोलवले.
सदर मीटिंगमध्ये शिर्के इन्फ्रा लिमिटेड या कंपनीच्या कामाबाबत सोसायटी पदाधिकाऱयांकडून सिडकोकडे नाराजी व्यक्त करण्यात आली. या कामांच्या क्वालिटी बाबत देखील सविस्तरपणे चर्चा करण्यात आली. संस्थेचे पदाधिकारी समीर कदम, विजय चव्हाण, अरुण मात्रे, अजित मोठे, दिलीप मस्के, विजय मोरे, अभिजीत गायकवाड, श्री कांबळे ,श्री काटकर, श्री म्हात्रे आदी पदाधिकारी यांनी आपली भूमिका आक्रमकपणे मांडल्याने सिडको अधिकारी श्री गोडबोले , श्री कराड, व श्री रघुवंशी यांनी बिल्डिंगचा सर्व्हे करून देऊ, स्ट्रक्चर ऑडिट करून देण्याचे आश्वासन दिले.
सर्व्हे केल्यानंतर तिथे रुममध्ये असणारे लिकेजेस, पडलेले प्लास्टर तसेच रंगकाम व इतर सर्व डागडुजीची कामे करून देण्याचे सांगितले. त्यामुळे या सोसायटीतील पदाधिकारी व रहिवासी यांनी तूर्तास आंदोलन मागे घेण्याची भूमिका घेतली आहे. सदर कामे सर्व प्रकारचे सर्व्हे करून एक महिन्यांमध्ये चालू करून लवकरात लवकर पूर्ण करून देऊ असे सांगितले आहे, तसे न झाल्यास आम्ही सर्व रहिवासी सिडको प्रशासनाविरोधात पुन्हा आंदोलनाची भूमिका घेऊ असे सामाजिक कार्यकर्ते समीर कदम यांनी यावेळी निक्षून सांगितले.

कोकण दर्पण.