Press "Enter" to skip to content

कोरोनाच्या संकटात डॉ डी वाय पाटील रुग्णालयाचे भरीव योगदान !

नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : मार्च २०२० च्या सुरुवातीलाच मुंबई, नवी मुंबई, रायगड आणि ठाणे जिल्ह्यात सुरुवातीला परदेशातून परतलेल्या आणि त्यानंतर हळूहळू स्थानिक नागरिकांना ही कोरोनाची लागण व्हायला लागली. अपूरी माहिती, नवखी उपचार पद्धती, अनाकलनीय आजारांची लक्षणे यामुळे सर्वच ठिकाणी चिंता आणि भयप्रद वातावरण निर्माण झाले.
याच पार्श्वभूमीवर, डॉ विजय पाटील, अध्यक्ष, डी वाय पाटील समुह, नवी मुंबई यांच्या पुढाकाराने, डी वाय पाटील रुग्णालयात कोरोनाचे रोगनिदान आणि उपचार सुरू करण्यात आले. याशिवाय समाजातील सर्व घटकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी, नवी मुंबईतील बहुतांश ठिकाणी, स्क्रिनींग साठी डाक्टरांच्या आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या साहाय्याने कॅम्प भरविण्यात आले.
यानंतर बदललेल्या परिस्थितीत, सातत्याने वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन, नवी मुंबई महानगरपालिका, पनवेल महानगर पालिका आणि ठाणे महानगरपालिकांच्या हद्दीतील नागरिकांसाठी व पोलिसांसाठी डी वाय पाटील रुग्णालयात बाह्यरुग्ण आणि आंतररुग्ण विभागात आजपर्यंत ३००० हून जास्त रुग्णांना उपचार केले गेले आहेत.
याशिवाय रुग्णालयातील अतिदक्षता आणि स्क्रिनींग विभागात २०००० हून जास्त रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. ३०० बेडच्या आय सी यू द्वारे तिन्ही महानगर पालिकेच्या रहिवाशांना आणि मुंबईतील बऱ्याच रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. याशिवाय कोविड नसलेल्या इतर सामान्य आजारांवर सुद्धा अशा कठीण परिस्थितीत, रुग्णालयाचे सी ई ओ, डीन यांच्या मार्गदर्शनाखाली बालरोग, स्त्रीरोग विभागासहीत सर्व विभाग चालू ठेवून सर्वांना दिलासा दिला आहे.

चौकट : वैद्यकीय संकटात उपयोगी पडणे हे कर्तव्य आणि आनंददायी बाब: डॉ विजय पाटील

नवी मुंबई, पनवेल आणि ठाणे महापालिकेच्या सर्व रहिवाशांवर ओढवलेल्या वैद्यकीय संकटात आमच्या रुग्णालयात सर्व प्रकारच्या उत्तम सुविधा उपलब्ध करून रुग्णालयातील व्यवस्थापकीय टीम आणि डॉक्टरांच्या सहकार्याने हजारो रुग्णांना मदत करु शकलो याचा मला आनंद वाटतो आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या सहकार्याने पार पडत असलेल्या कार्याबाबत अतिशय आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ विजय पाटील यांनी दिली.

डॉ विजय पाटील , कुलपती : डी वाय पाटील विद्यापीठ, नेरुळ, नवी मुंबई.

कोकण दर्पण.