पनवेल,कोकण दर्पण वृत्तसेवा : तळोजा नगरीत लोकवस्ती मोठ्याला झपाट्याने वाढत असून येथे राहणारे बहुसंख्य नागरिक हे अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील आहेत. येथील नागरिकांच्या वैद्यकीय सुविधेसाठी मोठे रुग्णालय नाही. त्यामुळे तळोजा नगरीत अत्याधुनिक सोई सुविधांचे शासकीय रुग्णालय बांधावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पनवेल शहर जिल्हा कार्याध्यक्ष शहबाज पटेल यांनी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्याकडे केली. यावेळी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष फारूक पटेल, खारघर शहर अध्यक्ष बळीराम नेटके, युवक अध्यक्ष प्रमोद बागल, इम्रान सुभेदार आदी उपस्थित होते.
सिडकोने वसविलेल्या तळोजा फेज १ आणि फेज १ या वसाहती मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. फेज १ मधील लोकवस्ती मोठ्या झपाट्याने वाढत आहे. दिवसागणिक झपाट्याने फोफावत असलेल्या तळोजा नगरीत नागरी प्रश्न देखील त्याच वेगाने वाढत आहेत. मात्र, सिडको आणि पनवेल महापालिका प्रशासनाचे याकडे लक्ष नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे शहबाज पटेल यांनी थेट मंत्रालय गाठून जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांची भेट घेवून निवेदन दिले.
तळोजातील नागरिकांना सर्वात जास्त वैद्यकीय सुविधेच्या अभावामुळे मोठी अडचण होत असल्याचे शहबाज पटेल यांनी अदिती तटकरे यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे तातडीने शासकीय रुग्णालय बांधावे, अशी मागणी केली.
कोणी आजारी पडले तर येथे साधी रुग्णवाहिका नाही, तर कोणाचा मृत्यू झाला तर शववाहिनी देखील नसल्याची शोकांतिका शहबाज पटेल यांनी यावेळी मांडली. त्यामुळे तळोजा नगरासाठी तातडीने रुग्णवाहिका आणि शववाहिनी द्यावी, अशी मागणी शहबाज पटेल यांनी यावेळी केली.
कोकण दर्पण.