Press "Enter" to skip to content

खारघर सेक्टर ३४, ३५ मध्ये गतिरोधक नसल्याने होतायत अपघात ! सिडकोने तातडीने गतिरोधक बसवावेत ! शहबाज पटेल यांची मागणी !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : खारघर सेक्टर ३४ व ३५ परिसरातील रस्त्यांवर गतिरोधक नसल्याने अपघांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिसरातील रहदारी मोठ्या प्रमाणात वाढल्याने किरकोळ होणारे अपघात मोठ्या दुर्घटनेत बदलण्याचा अधिक धोका निर्माण झाला आहे. सिडको प्रशासनाने सदर प्रश्नांची गंभीरपणे दखल घेऊन तातडीने खारघर सेक्टर ३४ व ३५ परिसरातील रस्त्यांवर गतिरोधक बसवावेत , अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पनवेल शहर जिल्हा कार्याध्यक्ष शहबाज पटेल यांनी सिडको प्रशासनाने लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

खारघर सेक्टर ३४ व ३५ परिसरात लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढल्याने रस्त्यावरील वाहनांची रहदारी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रस्त्यावर गतिरोधक नसल्याने वाहन चालक बेफामपणे वाहने चालवितात. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी अनेकदा किरकोळ अपघात होतात. भर वस्तीत महिला, वयोवृद्ध , नागरिक रस्त्याने चालत जात असतात. अशावेळी वेगवान वाहनांमुळे भविष्यत येथे मोठा अपघात होऊ शकतो. त्यामुळे खारघर सेक्टर ३४ व ३५ परिसरात ठिकठिकाणी गतिरोधक बसवावेत , अशी मागणी शहबाज पटेल यांनी केली आहे.

सिडको प्रशासनाने याबाबत वेळीच गंभीर दखल न घेतल्यास भविष्यात होणाऱ्या दुर्घटनेस सिडको प्रशासन व संबंधित अधिकारी जबाबदार असतील, त्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल ,असा इशारा शहबाज पटेल यांनी दिला आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पनवेल शहर जिल्हा कार्याध्यक्ष शहबाज पटेल

कोकण दर्पण.