शहबाज पटेल, कार्याध्यक्ष : राष्ट्रवादी युवक काँग्रेस – पनवेल शहर जिल्हा
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना आणि काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीचे सक्षमपणे नेतृत्व करून महाराष्ट्राच्या विकासाला दिशा देणारे खंभीर नेतृत्व म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे होय. उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि राज्याला खऱ्या अर्थाने लोकाभिमुख नेतृत्व मिळाले. भाजपच्या काळात आलेली सत्तेची मक्तेदारी जणू संपली.
उद्धव बाळ ठाकरे यांचा जन्म २७ जुलै १९६० रोजी झाला. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. २००३ साली उद्धव ठाकरेंचे वडील तत्कालीन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेडून शिवसेनेच्या पक्षप्रमुख पदाची सूत्रे उद्धव ठाकरे यांचेकडे देण्यात आली. उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्र राज्याचे २४ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.१४ मे २०२० उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली.
आरंभीच्या काळात उद्धव ठाकरे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्राच्या कामकाजात सक्रिय होते. निवडणुकांच्या काळात शिवसेनेच्या प्रचारयंत्रणेतही त्यांचा सहभाग असे. २००२ साली बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांत शिवसेनेला विजयश्री व त्यासह सत्ताही लाभली. पुढील वर्षी २००३ साली त्यांच्याकडे शिवसेनेच्या पक्षप्रमुख पदाची सूत्रे सोपवण्यात आली. मात्र या काळात तत्कालीन शिवसेनेतील प्रमुख नेते नारायण राणे व उद्धव ठाकरे यांच्यादरम्यान मतभेद वाढत राहिले आणि अखेरीस नारायण राणे यांना पक्षातून काढण्यात आले. उद्धव ठाकरे व त्यांचे चुलतभाऊ राज ठाकरे यांच्यातील दरीही रुंदावत गेली; परिणामी २००६ साली राज ठाकरे यांनी शिवसेना नेते पदाचा राजीनामा दिला व महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नव्या पक्षाची स्थापना केली . २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाशी युती न करता उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे ६३ आमदार निवडून आणले.२०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत उध्दव ठाकरे यांनी पुन्हा भाजप बरोबर युती करून निवडणूक लढवली व ५६ आमदार निवडून आणले. पण सत्ता वाटप करण्यात वाद निर्माण झाल्यामुळे युती तुटली व उध्दव ठाकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आय सोबत महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन केले व राज्याच्या २४ व्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली.
पुरोगामी महाराष्ट्रात आपली मक्तेदारी प्रस्थापित करण्याचा खटाटोप करणाऱ्या भाजपला राजकीय धडा शिकवून महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळा एका वेगळ्या परंपरेची भरणी उद्धव ठाकरे यांनी केली. महाराष्ट्राला विकास हवाय, मात्र भाजप काहीतरी वेगळे राजकारण सजवतेय हे उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आले. २०१९ मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी भाजपशी फारकत घेतली. महाराष्ट्राच्या राजकारणातील शिवसेनेचा हा निर्णय क्रांतिकारी ठरला, शिवसेनेला नवी उभारी देणारा ठरला. महाराष्ट्रात जो सत्तेचा कायापालट झाला त्याचे किंगमेकर म्हणून महत्वाची भूमिका बाजावली ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तथा देशाचे नेते शरद पवार यांनी. एकसंघ महाराष्ट्र आणि राज्याच्या विकासासाठी तिन्ही पक्षांना एकत्र आणण्यात शरद पवार यांची भूमीका महत्वाची आहे. महाविकास आघाडीचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांनी करावे, राज्याच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी स्वीकारावी, असे शरद पवार यांनी सुचवले होते. आज उद्धव ठाकरे मोठ्या कौशल्याने राज्याची धुरा सांभाळत आहेत.
महाविकास आघाडीचा राज्यातील यशस्वी प्रवास सुरु आहे. मात्र, हे सरकार कधी पडतंय ,यासाठी भाजप विरोधकांनी देव पाण्यात ठेवलेत. मात्र, शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ,काँग्रेसच्या मदतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील लोकशाहीचं सरकार पाडणे, भाजपला शक्य नाही.
उद्धव ठाकरे यांचे कौशल्य, संयम, समन्वय, जिद्द आणि सातत्य या कार्यप्रणालीमुळे राज्याच्या विकासाला नक्कीच गती मिळेल. कोरोनाच्या संकटात महाविकास आघाडी सरकारने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला सांभाळले आहे. उद्धव ठाकरे यांचे योगदान, सकारात्मक प्रोत्साहन महत्वाचे आहे. त्यांच्या या स्फूर्तिदायी कार्याला सलाम आणि वाढदिवसानिमित्ताने लाख लाख शुभेच्या !
संकलन : संजय महाडिक