पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खारघर विभागात येणाऱ्या इनामपुरी गावामध्ये एका खासगी जमिनीवर हायटेन्शन विद्युत वाहिनीच्या बाजूलाच अनाधिकृतपणे उभारण्यात येत असलेल्या मोबाईल टॉवरवर पनवेल मनपा प्रशासनाने बुलडोजर चढविला.
प्रशासनाला याबाबत माहिती मिळताच पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या आदेशाने कारवाई प्रभाग अधिकारी दशरथ भंडारी यांनी निष्कासन कारवाई केली.
संबंधिताविरूद्ध 20 जुलै 2020 रोजी 24 तासात स्वतःहून अनधिकृत बांधकाम काढून घेण्याची नोटीस दिली होती. या नोटीसला संबंधित मोबाईल टाॅवर कंपनीने कोणतेही उत्तर दिले नाही तसेच अनधिकृत बांधकाम सुरूच ठेवले होते.
कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग हादरले आहे. सर्वत्र कोरोनाशी लढण्यास प्रशासन व जनता व्यस्त आहे. महानगरपालिका हद्दीत लाॅकडाऊन सुरू आहे. याच कामात प्रशासकीय यंत्रणा कामाला लागल्या असताना काही व्यक्ती बेकायदेशीर कामे करत आहेत. अशा व्यक्तींना कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागणार आहे.
मंगळवारी प्रभाग अधिकारी दशरथ भंडारी यांच्या पथकाने खारघर येथील इनामपुरी गावातील म्हात्रे यांच्या एका खासगी जागेवर विना परवानगी उभारलेला मोबाईल टाॅवर निष्कासित केला. त्याबाबत पालिकेची कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. परवानगी न घेता टॉवरचे बांधकाम सुरू होते. म्हणून विना परवाना टॉवरचे बांधकाम आज उध्वस्त करण्यात आले.
पालिका प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या कामात व्यस्त असल्याचा गैरफायदा घेऊन कोणी अनधिकृत बांधकाम करत असेल त्याच्यावर कारवाई होईल हे प्रशासनाने आज दाखवून दिले आहे.
सदर अनधिकृत बांधकामाबाबत संबंधितांना 24 तासांची मुदत दिली होती, त्यांनी महानगरपालिकेची कोणतीही परवानगी घेतली नव्हती. नोटिशीची मुदत संपताच पालिकेमार्फत या अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई करण्यात आलेली आहे. अशी माहिती उपायुक्त अतिक्रमण जमीर लेंगरेकर यांनी दिली.