Press "Enter" to skip to content

पनवेलमधील कोरोना रुग्णांसाठी अँटीजन टेस्ट चाचणी सुरू !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पनवेल महापालिका प्रशासन अनेक उपाययोजना आखत असून आता कोरोना रुग्णांसाठी पनवेल मधील सर्व मनपा रुग्णालयात अँटिजेन टेस्ट चाचणी सुरू करण्यात आल्याची माहिती पनवेल मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी कोकण दर्पणशी बोलताना दिली. सध्या सर्व मनपा रुग्णालयात साधारणतः २५ रुग्णांची टेस्ट करता येत असून चाचणीचे प्रमाण आणखी वाढविण्यात येणार असल्याचे सुधाकर देशमुख म्हणाले. अँटिजेन टेस्टमुळे कोरोनाचा संसर्ग झाला आहे की नाही ते फक्त ३० मिनिटात कळणार असून बाधित रुग्णांना तातडीने उपचार सुरू करता येतात.

खारघरमधील नागरी आरोग्य केंद्रात देखील अँटीजेन टेस्ट चाचणी सुरू करण्यात आल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत आहे. खारघर मध्ये कोरोनाच्या रुग्णात वाढ होत असल्याचे आणि कोरोनाच्या चाचणीसाठी खारघरच्या बाहेर जावे लागत असल्यामुळे पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी खारघर सेक्टर १२ मधील पालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रात रुग्णास कोरोनाची लागण झाली किंवा नाही हे तपासणी साठी अँटीजन टेस्ट चाचणी सुरू केली आहे
खारघर मध्ये कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असल्यामुळे पालिकेच्या माध्यमातून अँटीजेन टेस्ट च्या माध्यमातून ३० मिनिटात रुग्णाचा अहवाल प्राप्त होतो. सकाळी १० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत रुग्णाची तपासणी केली जात आहे, अशी माहिती डॉ.पंकज टीटार वैधकीय अधिकारी, नागरी आरोग्य केंद्र खारघर पनवेल पालिका यांनी दिली.

कोकण दर्पण