नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात असताना या कोरोना विरोधातील लढयाला विविध संस्था, व्यक्ती यांच्यातर्फेही बळ दिले जात असून बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचेमार्फत आमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम २०२०-२१ अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य व्यवस्थेचे सक्षमीकरण करण्याकरीता तीन अदययावत रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.
सोमवारी महापालिका मुख्यालय इमारतीसमोर या रुग्णवाहिकांचे लोकार्पण आमदार मंदाताई म्हात्रे व महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व संजय काकडे, माजी नगरसेवक रामचंद्र घरत, डॉ. जयाजी नाथ, अशोक गुरखे, संपत शेवाळे, सुनिल पाटील, दिपक पवार, भरत जाधव आणि इतर महापालिका अधिकारी व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी कोरोना विरोधातील लढाईत महापालिका प्रशासनाप्रमाणेच लोकप्रतिनिधी, विविध संस्था, नागरिकही आपला सहभाग देत असताना आवश्यक रुग्णालयीन सुविधांची गरज लक्षात घेऊन त्यांच्या पूर्ततेसाठी १ कोटी रकमेचा आमदार निधी महानगरपालिकेला उपलब्ध करुन दिला असल्याचे सांगितले. त्यामधील साधारणत: ५० लक्ष निधातून सर्व सुविधांनी युक्त ३ रुग्णवाहिका आज नागरिकांच्या सेवेत दाखल होत असून नागरिकांना वेळेत उपचार व्हावेत याकरीता या रुग्णवाहिका उपयुक्त ठरतील असे त्यांनी सांगितले.
महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सध्याचा कोव्हीड-१९ परिस्थितीमध्ये ज्या सुविधांची आत्यंतिक गरज आहे त्यामध्ये रुग्णवाहिका ही महत्वाची गरज असून आमदार मंदाताई म्हात्रे यांनी ऑक्सिजन सुविधा व मॉनिटरसह सुसज्ज अशा ३ रुग्णवाहिकांच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिकेला योग्य सहकार्य केल्याबद्दल आभार मानले. या रुग्णवाहिकांचा कोव्हीड व्यवस्थापनात चांगला उपयोग होईल असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.
बेलापूर विधानसभा सदस्य आमदार मंदाताई म्हात्रे यांचेमार्फत आमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम २०२०-२१ मधून बेसिक लाईफ सपोर्ट स्वरुपाची १ अदययावत रुग्णवाहिका आणि पेशंट ट्रान्सपोर्ट ॲम्ब्युलन्स स्वरुपाच्या २ अशा एकूण ४८ लक्ष ४४ हजार रक्कमेच्या एकूण ३ रुग्णवाहिका नवी मुंबई महानगरपालिकेस उपलब्ध झाल्या असून त्या महानगरपालिकेचे सार्वजनिक रुग्णालय, नेरुळ व माता बाल रुग्णालय, बेलापूर तसेच सार्वजनिक रुग्णालय, वाशी या ठिकाणी रुग्णसेवेसाठी सज्ज असणार आहेत.
कोव्हीड- १९ रुग्णसेवेत मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीतून ३ रुग्णवाहिका दाखल !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »