पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात असंसदीय भाषा वापरणाऱ्या पनवेल महापालिकेतील भाजपचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांच्या विरोधात रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त संजयकुमार यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
गायकवाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी घरत यांनी केली आहे. पनवेल महानगरपालिकेतील भाजपचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांच्या असंसदीय भाषेतील क्लिपचा शिवसैनिकांनी तीव्र निषेध केला आहे.
पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी राजगृहावरील नासधुसी प्रकरणात शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे
यांच्या विरूद्धसुद्धा असंसदीय भाषेतील क्लिप प्रसारीत केल्याने याबद्दल शिवसैनिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. शुक्रवारी शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईचे पोलिस आयुक्त संजयकुमार, परिमंडळ-2 चे पोलिस उपायुक्त अशोक दुधे, सहाय्यक पोलिस आयुक्त रविंद्र गिड्डे यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले व त्यांच्या कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हाप्रमुख शिरीषजी घरत, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, महानगरप्रमुख रामदास शेवाळे, तालुकाप्रमुख एकनाथ म्हात्रे, उपमहानगरप्रमुख दिपक घरत, उपमहानगर संघटक गुरूनाथ पाटील, विभागप्रमुख गणेश म्हात्रे, शहरप्रमुख सदानंद शिर्के, किरण तावदरे, महिला आघाडी उपजिल्हा संघटक कल्पना पाटील, , तालुका संघटक प्रतिभा सावंत, उपमहानगरसंघटक रिना पाटील शहर संघटक अपूर्वा प्रभु, ज्योती मोहिते, नरेश ढाले आदी उपस्थित पदाधिकारी होते. या निवेदनात शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी म्हटले आहे की, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरें साहेबांनसह शिवसेनेने सदैव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर केला आहे. ज्या कुणी अशा प्रकारचा निंदनिय प्रकार केला त्याला योग्य ती कारवाई झालीच पाहिजे. परंतु उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या विषयी अपमानाजनक वक्तव्य क्लिपद्वारे केले आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी त्यांनी महानगरपालिका आयुक्त यांच्याविरोधात वक्तव्य क्लिपद्वारे केले होते. त्यावरही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. तरी यासंदर्भात पोलिस प्रशासनाने गायकवाड विरोधात कारवाई करून गुन्हे दाखल कऱण्यात यावेत. अन्यथा शिवसेनेतर्फे त्यांच्या घरावर मोर्चा काढून निषेध केला जाईल व शिवसेना आपल्या भाषेत त्यांना उत्तर देईल असा इशारा शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी यावेळी दिला आहे.
कोकण दर्पण.