प्रतिनिधी, पनवेल : कोरोनाच्या महामारीदरम्यान अवलंबलेल्या जवळपास चार महिन्याच्या लॉक डाऊनमुळे सर्वांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. यामध्ये कर्जदार मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत. त्यामुळे बँकेचे कर्जाचे हप्ते भरण्यासाठी सवलत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पनवेल शहरजिल्हा कार्याध्यक्ष शहबाज पटेल यांनी राज्याचे मुखमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
लॉक डाऊनच्या काळात सर्वसामान्य जनतेला मोठी अर्थिक झळ पोहचली आहे. घर कसे चालवावे, हा प्रश्न त्यांना भेडसावत असताना बँकेचे कर्जाचे हप्ते कसे भरावे, ही मोठी समस्या त्यांच्या डोक्यावर येऊन बसली आहे. अनेकांनी बॅंकेतून कर्ज काढून घर घेतले आहे. अनेकांनी शिक्षण किंव्हा अनेक कौटुंबिक अडचण दूर करण्यासाठी कर्ज घेतली आहेत. मात्र, आर्थिक संकटात आता हप्ते थकल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. सरकारने याबाबत तोडगा काढून बँकांना सूचना कराव्यात. जो पर्यंत कोरोनाचे संकट संपत नाही, आर्थिक बाबी रुळावर येत नाही, तोपर्यंत कर्जाचे हप्ते न भरण्याची मुभा दयावी, अशी मागणी पटेल यांनी केले आहे. कर्जाचे हप्ते भरण्यासाठी दिलेल्या कालावधीचे व्याज किंव्हा दंड देखील आकारू नये, असे देखील शहबाज पटेल यांनी नमूद केले आहे.

कोकण दर्पण.





