पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : कोरोनाला रोखण्यासाठी पनवेल महापालिका करीत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक आहेच , मात्र , पावसाळ्यात उद्भवणाऱ्या अधिकच्या संकटाची चाहूल पलिका प्रशासनाने ओळखणे गरजेचे आहे.पावसाळ्यात मलेरिया , डेंगू ,कावीळ सारख्या साथीच्या रोगांचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यात हे कोरोनाच्या संसर्गाचे मोठे संकट आहे. त्यामुळे एक खबरदारी म्हणून पनवेल महापालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करावी ,अशी मागणी भाजपा ,महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेल सरचिटणीस आर के दिवाकर यांनी पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख, महापौर कविता चौतमल , आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
यामुळे शहराचा आरोग्याचा ग्राफ प्रशासनाकडे उपलध राहील आणि भविष्यात येणाऱ्या संकटाला मात करण्यासाठी नियोजन करण्यास मदत होईल, असे देखील दिवाकर यांनी नमूद केले आहे.
खारघर हा पनवेल मनपा क्षेत्रातील सर्वात मोठा विभाग आहे. तळोजासहित सुमारे पाच लाख लोकवस्ती येथे राहते. सध्या कोरोनाचे संकट आहे. हा धोका पावसाळ्यात आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. पनवेल मनपा हद्दीतील रुग्णांमध्ये आज खारघर दुसऱ्या क्रमांकावर आहे. खारघरच्या दृष्टीने हि अत्यंत गंभीर बाब आहे. पावसाळ्यात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची संभावना अधिक आहे. अशावेळी उपचारासाठी कामोठे एमजीएम आणि पनवेल उपजिल्हा रुग्णालयात धावाधाव करणे मुश्किल होऊन जाईल. त्यामुळे खारघर सारख्या जास्त लोकसंख्या असलेल्या नोडमध्ये कोरोना तपासणी केंद्र आणि उपचार केंद्र सुरु करावे, असे निबवेदनात म्हटले आहे. ग्रामविकास भवनमध्ये अलगीकरण केंद्र आहे , मात्र तिथे पुरेशा सुविधा नसल्याची ओरड केली जात आहे. याकडे देखील आपण लक्ष द्यावे असे दिवाकर यांनी म्हटले आहे.
सध्या कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. मात्र, ज्या सोसायट्यांमध्ये रुग्ण आढळत आहेत ती सोसायटी सील करणे किंव्हा तिथे निर्जंतुकीकरण करण्याबाबत प्रशासन पाहिल्या सारखे गंभीर दिसत नाही. यामुळे, बिघडलेल्या परिस्थितीत आणखी भर पडत आहे. आपण गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी दिवाकर यांनी केली आहे.
कोकण दर्पण





