आरोग्यमंत्री व शिक्षण मंत्र्यांची शिष्टमंडळ लवकरच घेणार भेट !
पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा :पनवेल महानगरपालिकेकडून नागरिकांच्या आरोग्याबाबत हलगर्जीपणा उद्भवल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. कोव्हिडच्या युद्धजन्य परिस्थिती मध्ये नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत तसेच महानगर पालिकेचे आरोग्य व शिक्षण या सारख्या काही विशेष मुद्यांवर लक्ष केंद्रित करण्याकरिता पनवेल महानगर पालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रायगड जिल्ह्याच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. दरम्यान, शिष्टमंडळाच्या भेटी दरम्यान आयुक्तांनी नकारात्मक प्रतिसाद दिल्याचे रायगड जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांनी सांगितले. त्यामुळे मनसेचे शिष्टमंडळ महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री व शिक्षणमंत्री यांची भेट घेऊन समस्या मांडणार असल्याचे श्री भगत यांनी नमूद केले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अतुल चव्हाण, जिल्हा सचिव केसरीनाथ पाटील, मनविसे जिल्हाध्यक्ष ऍड अक्षय काशीद, पनवेल शहराध्यक्ष शीतल सिलकर, खारघर शहराध्यक्ष प्रसाद परब उपस्थित होते.
पनवेल महानगरपालिकेला शासनाकडून आकृतिबंध मंजूर करण्यात आला आहे. त्यामध्ये पनवेल मनपाच्या आरोग्य व शिक्षण विभागाच्या जागांचा देखील उल्लेख आहे. परंतु आजपर्यंत पनवेल महानगर पालिकेच्या हलगर्जीपणामुळे जागा रिक्त आहेत. समन्वयाच्या अभावामुळे वैद्यकीय व शिक्षण यंत्रणा वाऱ्यावर सोडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नागरिकांना हॉस्पिटल मधील कोरोना संबंधी जागेची व दरांची अचूक माहिती देणे, खाजगी हॉस्पिटलच्या भरमसाठ बिलांवर अंकुश ठेवणे व शाळांच्या फी वाढी संदर्भात निर्णय घेणे आयुक्तांना अवघड झाले आहे. शासनाच्या कामाबद्दल उदासीनता दिसून येत आहे, असा टोला मनसेने यावेळी लगावला.
कोकण दर्पण