संजय महाडिक
रायगड जिल्ह्यातील एक सामान्य तरुण, खंबीर नेतृत्व ते एक सच्चा लोकनेता असा रामशेठ ठाकूर यांचा प्रवास अत्यंत संघर्षशील आहे. रामशेठ ठाकूर यांचे व्यक्तिमत्व म्हणजे रायगड जिल्ह्याचे सोनेरी पान होय. सर्वसामान्य जनतेला रायगड जिल्ह्याचा वाटणारा अभिमान, स्वाभिमान म्हणजे रामशेठ ठाकूर होय.
रामशेठ ठाकूर हे रायगड जिल्ह्यातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. आज त्यांनी यशाचे सर्वोच्च शिखर गाठले आहे, मात्र या यशामध्ये त्यांचे अपार कष्ट , जिद्द , चिकाटी, प्रामाणिकपणा , प्रयत्नांचे सातत्य आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतःच्या मेहनतीवर असलेला त्यांचा ठाम विश्वास आहे. २ जून २०२० रोजी रामशेठ ठाकूर यांचा ६९ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आपलं महानगराचे विशेष प्रतिनिधी संजय महाडिक यांनी रामशेठ यांच्या जीवनप्रवाहावर टाकलेला कटाक्ष…….
देशाचा गौरव, महाराष्ट्राचा मान आणि कोकणाची शान असलेल्या ऐतिहासिक रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यामध्ये असलेल्या नावेखाडी गावामध्ये २ जून १९५१ रोजी रामशेठ ठाकूर यांचा जन्म झाला. पावसाळ्यात येणाऱ्या पुराच्या संकटामुळे पुढे हे गाव शिवाजीनगर म्हणून प्रस्तापित झाले. रामशेठ यांचे शेतकरी कुटुंब. शेती आणि रेतीचा व्यवसाय कुटुंबात केला जात होता. मात्र, रामशेठ यांची उच्च शिक्षण घेण्याची जिद्द होती. आपले शिक्षण पूर्ण करून रामशेठ ठाकूर कोकण एज्युकेशन सोसायटीच्या पनवेल येथील शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. पुढे रयत शिक्षण संस्थेच्या वाशी येथील मॉडर्न कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले.
शिक्षक म्हणून नवी पिढी घडविण्याचे कार्य रामशेठ प्रामाणिकपणे करीत होते. मात्र, रामशेठ यांची आयुष्यातील स्वप्ने आकाश इतकी उंच होती. त्यांना आयुष्यत फार मोठी भरारी भ्यायचे होती . मग त्यांनी व्यवसायात उतरण्याचे ठरविले. रयत शिक्षण संस्थेतील शिक्षक म्हणून नोकरी सोडली आणि १९७५- ७६ साली व्यवसायात उडी मारली.व्यवसाय उभा करण्यासाठी रामशेठ ठाकूर यांनी अफाट कष्ट घेतले, वेदना सहन केल्या. अनेक अडचणी आल्या मात्र, मागे हटले नाही. पनवेल, रायगडच नव्हे तर महाराष्ट्र आणि देशातील एक यशस्वी उद्योजक म्हणून रामशेठ ठाकूर यांची ख्याती निर्माण झाली. रामशेठ ठाकूर यांची ठाकूर इन्फोटेक प्रा.लि. कंपनी रामशेठ यांच्या यशाचे मोठे द्योतक आहे.
पनवेल आणि रायगड जिल्ह्यातील एक वजनदार उद्योगजक म्हणून रामशेठ यांनी आपला दबदबा निर्माण केला. या यशाला रामशेठ ठाकूर यांनी सामाजिक कार्याची जोड दिली. माणूस कितीही मोठा झाला , यशस्वी झालो , जो पर्यंत त्याला समाजाची जाणीव होत नाही तोपर्यंत तो खऱ्या अर्थाने यशस्वी होत नाही. मुळात रामशेठ यांना सामाजिक जाणीव अपार होती. सामाजिक कार्यासोबत त्यांनी काहीप्रमाणात राजकारणात रस घेतला. मात्र, स्वतः: राजकारणात मोठ्या प्रमाणात सक्रिय न होता , पनवेल आणि रायगड जिल्ह्यातील किंगमेकर म्हणून रामशेठ यांची भूमिका राहिली. आरंभी रामशेठ काहीदिवस जनता पक्षात होते. पुढे रामशेठ शेतकरी कामगार पक्षात सक्रिय झाले. राजकारणातील रामशेठ ठाकूर यांची जोरदार एंट्री म्हणजे थेट देशाच्या लोकसभेत विजयश्री मिळविली.
रामशेठ यांनी १९९८ साली शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने कुलाबा अर्थात रायगड लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविली आणि जिंकून आले. रामशेठ यांच्या सामाजिक कार्याची , लोकसेवेचे गती आणि वाढली. आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला मदत करण्याची रामशेठ ठाकूर यांची भावना लोकमनावर असा परिणाम करून गेली , कि रामशेठ रायगड जिल्ह्यातील लोकनेते झाले. लोकनेता , दानशूर राजा , समाजाचा महामेरू , शिक्षणमहर्षी अशा अनेक लोक उपाध्या त्यांना मिळाल्या. शेतकरी कामगार पक्षांतर रामशेठ यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. रामशेठ यांच्यामुळे पनवेलमध्ये काँग्रेस तरला. आज देशात भाजपची सत्ता असली तरी पनवेल, उरणमधील भाजपचे यश हि लोकनेते रामशेठ यांची किमया आहे.
व्यवसाय , समाजकारण आणि राजकारण करताना रामशेठ यांनी शिक्षण क्षेत्रात आपले पाऊल टाकले. १९९२ साली त्यांनी जनार्धन भगत शिक्षण प्रसारक संस्थेची स्थापना केली. त्यामाध्यमातून पनवेल , नवीन पनवेल, खांदा कॉलनी, खारघर येथे शिक्षणाची केंद्रे सुरु केली. सीकेटी स्कूल, सीकेटी कॉलेज , रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल, रामशेठ ठाकूर कॉलेज अशा नावाने शाळा -कॉलेज सुरु केली. केजी पासून उच्च शिक्षणापर्यंतची सोय रामशेठ यांनी केली. आज हजारो विद्याथी येथे शिकत आहेत.
एक यशस्वी उद्योजक , एक यशस्वी समाजकारणी , एक यशस्वी राजकारणी असा रामशेठ यांचा प्रवास तरुण पिढीला प्रेरणा देणारा आहे. सत्तरीकडे वळताना रामशेठ यांना राजकीय निवृत्तीचे वेध लागले आहेत. खरंतर, सामान्य जनतेला हे न पचणारे आहे. कारण रामशेठ यांचे सक्रिय असणे म्हणजे समाजाला नवी ऊर्जा , प्रेरणा , चालना आणि विश्वास मिळण्यासारखे आहे.