पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : लॉकडाऊन असल्यामुळे सामान्यांपासून ते अनेक सेलेब्रिटी आणि दिग्गज राजकारणी मंडळी सध्या घरातच आपला वेळ घालवीत आहेत. यामुळे अनेक लोकांना त्यांचे वाढदिवस लॉकडाऊनमुळे घरातच साजरे करावे लागले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हेही त्याला अपवाद नाहीत.
आज २४ मे म्हणजेच अमित राज ठाकरे यांचा वाढदिवस. अमित ठाकरे यांची नुकतीच मनसेच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. शिवसेना आमदार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा युवासेनेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश खूप लवकर झाला होता, मात्र अमित यांना राजकारणात आणण्यापूर्वी राज यांनी त्यांना मुंबई, ठाणे, नाशिक, नवी मुंबईत फिरून मनसैनिक, पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घ्यायला पाठविले. मुंबईतील मनसेच्या जवळपास प्रत्येक शाखेत जाऊन त्यांनी संवाद साधला.
यामुळे अमित ठाकरेंचा जनसंपर्क वाढला. परिणामी ते मनसे कार्यकर्त्यांच्या आणि तरुणांच्या गळ्यातला ताईत बनले. विविध समाजकार्य असो व आंदोलन असो, नेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी पूर्ण मैदान काबीज करण्यास सुरुवात केली. अमित ठाकरे यांनी यापूर्वी मनसे उमेदवाराच्या प्रचारासाठी, तसेच आरेमधील आंदोलनात उतरल्याचं पाहायला मिळाले होते. अलीकडेच नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी अमित ठाकरेंच्या नेतृत्वात थाळीनाद आंदोलन करण्यात आले होते.
सध्या भारतासोबत संपूर्ण जग कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावत आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या पीपीई किट्सचा राज्यात तुटवडा आहे. हिच गरज लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी 1000 पीपीई किट्स, तसेच मास्कची मदत ‘मार्ड’ या डॉक्टरांच्या संघटनेला केली होती. यासोबतच अमित ठाकरेंकडून डॉक्टरांना चार हजार हायप्रोटिन्सयुक्त खाद्यपदार्थांच्या पॅकेट्सचीसुद्धा मदत करण्यात आली होती.
अमित यांच्या नवी मुंबईतील आंदोलनानंतर या परिसरात मनसेचा जनसंपर्क वाढला आणि याचा उपयोग अनेक समाजउपयोगी कार्यांसाठी करण्यात आला. नवी मुंबई आणि विशेषतः खारघरमध्ये मनसैनिकांचा मोठ्या प्रमाणात राबता आहे. म्हणून अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने रविवारी खारघरमधील सफाई कामगार, ग्रामविकास भवन आणि खारघरमधील जवळपास १०० ते १५० सोसायटीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना खारघर आणि नवनिर्माण सेवाभावी संस्था यांच्यावतीने ‘आर्सेनिक ३०’ या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
त्यावेळी मनविसे रायगड जिल्हा अध्यक्ष ऍड अक्षय काशिद, मनसे खारघर शहर अध्यक्ष प्रसाद परब, संतोष पंडित, सत्यजित मयेकर, सुशील विश्वास, गणेश बनकर आणि गोविंद सुप्पया आदी. या कार्यकर्त्यांनी लॉकडाउनच्या काळात हि औषधें उपलब्ध करून देण्यासाठी मौलाची भूमिका बजावली.






