Press "Enter" to skip to content

शवागरातील मृतदेह अदलाबदल प्रकरण ! उच्चस्तरीय चौकशीची हाजी शाहनवाज खान यांची मागणी !

नवी मुंबई , कोकण दर्पण वृत्तसेवा : मृत हिंदू मुलीचा मृतदेह मुस्लिम कुटुंबाकडे तर मुस्लिम मुलाचा मृतदेह हिंदू कुटुंबाकडे देण्याचा कर्मचाऱ्यांचा प्रताप नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी केला. यामुळे दोन्ही कुटुंबांना नाहक त्राससहन करावा लागत आहे. सदर प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करावी, अशी मागणी एमआयएमचे नेते शाहनवाज खान यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांकडे केली आहे.

सरकारने न्याय न दिल्यास वेळेला न्यायालयात जाण्याचा इशारा शाहनवाज खान यांनी दिला आहे.
तरुणीचा मृतदेह समजून एका तरुणाचा मृतदेह तिच्या नातेवाईकांना दिल्याची घटना समोर आली आहे. नवी मुंबई महापालिका आरोग्य प्रशासनाच्या या भोंगळ कारभारामुळे दोन्ही कुटुंबाना याच नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका रुग्णालयाच्या शवागरातून मोहम्मद उमर फारुख शेख (29) या व्यक्तीचा मृतदेह एका मृत तरुणीच्या नातेवाईकांना देण्यात आला. विशेष म्हणजे ज्या नातेवाईकांना उमर शेखचा मृतदेह देण्यात आला, त्या नातेवाईकांनी देखील ताब्यात घेतलेला मृतदेह मुलीचा असल्याची खातरजमा न करता हिंदू पध्दतीने अंत्यसंस्कारदेखील केले. दुसरीकडे मोहम्मद उमरचा मृतदेह समजून त्याच्या कुटुंबियांना एका मुलीचा मृतदेह देण्यात आला. ही बाब त्यांच्या लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी तो घेण्यास नकार दिला. त्यांनी मुलाचा मृतदेह आपल्या ताब्यात द्यावा अशी मागणी केली आहे. त्यामुळे पालिका आरोग्य प्रशासनाचा पुरता गोंधळ उडाला आहे.

सदर विषय एमआयएमचे विद्यार्थी संघटनेचे कोकण निरीक्षक हाजी शाहनवाज खान यांनी उचलून धरला असून या फसवणूक झालेल्या कुटुंबांना न्याय मिळवून देण्याचा विडा त्यांनी उचलला आहे. यासाठी हाजी शाहनवाज खान यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांच्यासह आरोग्य मंत्री यांच्याशी पत्रव्यवहार करून उच्चस्तरीय चौकशी करण्याचे तसेच संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे यावेळी सांगितले. तसेच यावेळी न्याय न मिळाल्यास आपण या फसवणूक झालेल्या कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयीन लढाई लढणार असल्याचेही यावेळी त्यांनी बोलताना सांगितले.

एमआयएम विद्यार्थी संघटनेचे कोकण निरीक्षक हाजी शाहनवाज खान