Press "Enter" to skip to content

उत्तराधिकारी नेमण्याची बुद्धांची शिकवण आंबेडकरी चळवळीला जिवंत ठेवू शकते – डॉ जी के डोंगरगावकर !

नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : वंश श्रेष्ठत्व आणि वारसा संघर्षाने फुले, शाहू , आंबेडकरी चळवळीला अधोगती आली आहे. नेतृत्व आणि वारसा नियुक्तीच्या कारणावरून डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर राजकीय , धार्मिक , शैक्षणिक संस्थांमध्ये आंबेडकरी संस्थेच्या नेतृत्व तथा वारसाच्या नियुक्तीबाबत असलेल्या वादातून आंबेडकरी चळवळ विखुरली गेली आहे. उत्तराधिकारी नेमण्याची बुद्धांची शिकवण आंबेकरी चळवळीला जिवंत ठेवू शकते, असे प्रतिपादन जेष्ठ विचारवंत डॉ जी के डोंगरगावकर यांनी आज बुद्धजयंतीनिमित्ताने केले. यावेळी त्यांनी भगवान बुद्धाच्या राजत्यागाची आठवण करून दिली.
डॉ जी के डोंगरगावकर पुढे म्हणाले, ज्या भारत भूमीत भगवान गौतम बुद्ध , सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जन्म घेतला त्या भारत भूमीत प्रस्थापित आणि विस्थापित सामाजिक ,राजकीय, शैक्षणिक, धार्मिक संस्थांमध्ये त्यांच्या वारसाबाबतचा संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. आंबेडकरी चळवळीच्या मूळ हेतूला बगल दिल्यामुळे आंबेडकर चळवळीची आणि पर्यायाने देशातील समाजाची वाटचाल अधोगतीकडे सुरु झालेली आहे. जो पर्यंत आंबेडकरी चळवळीच्या नेतृत्वाचा विचार हा बहुमताने होत नाही तोपर्यंत आंबेडकरी चळवळ सर्व समाजापर्यंत पोहचणार नाही, म्हणून आंबेडकरी चळवळीच्या नेतृत्वाचा विचार हा बहुमताने झाला पाहिजे. हुकूमशाही पद्धतीत उत्तराधिकाऱ्याची नियुक्ती हि बुद्ध विचारांची पायमल्ली आहे. अशा वेळी भगवान बुद्धांनी केलेला उपदेश उपयोगाचा आहे, असे डॉ डोंगरगावकर यांनी नमूद केले.

भगवान बुद्धाच्या राजत्यागाची आठवण करून देताना डॉ डोंगरगावकर म्हणाले , सिद्धार्थ गौतम बुद्ध हे राजपुत्र असून त्यांनी राजवैभवाचा त्याग केला. जीवनभर त्यांनी प्राप्त झालेल्या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार केला. प्रारंभीच्या काळात भगवान बुद्धांचे वडील, मावशी , पत्नी व नातेवाईकांचा गृहत्यागाला विरोध होता. मात्र पुढे भगवान बुद्धांच्या सद्धम्म आणि त्यांच्या संघात त्यांची सावत्र आई भिक्षुणी महाप्रजापती , माता यशॊधरा ,पुत्र राहुल यांनी भिक्षु होऊन भिक्षु संघात सहभागी झाले होते. भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणाच्या शेवटच्या क्षणी त्यांचा सारथी भिक्षु आंनद यांनी भगवान बुद्धांच्या निर्वाणानंतर भगवंताच्या धम्मसंघाच्या वारसाबाबत विचारणा केली होती. मात्र बुद्धांनी धम्मसंघात असलेल्या पुत्र, पत्नी अथवा मावशीला अथवा आनंदला वारस नेमले नाही. तेव्हा बुद्ध म्हणाले अत: दीप भव. भिक्षुसंघाच्या सभेत एखादा विषय आल्यास त्यावर सर्वानुमते विचारविनिमय करून बहुमताने आलेला निर्णय शिरसाध्यापणे आम्लात आणावा, असे बुद्धांनी आनंदला सांगितले.
मात्र , १९६५ नंतर आजतागायत फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक संस्थांनी बुद्धांचा विचार मोडीत काढल्यानंतर आंबेडकरी संघटना अधोगतीकडे गेल्या आहेत.बाबासाहेबांच्या राजकीय विचाराचा एकही लोकप्रतिनिधी महाराष्ट्र विधानसभा अथवा लोकसभेच्या सभागृहात नाही, अशी खंत डॉ. जी के डोंगरगावकर यांनी व्यक्त केली.
लोकजनातून बहुमताने निवडलेला नेताच आंबेडकरी चळवळीला उच्छष्टिक्रवर नेऊ शकतो, आज धार्मिक, शैक्षणिक राजकीय संघटनेला वंश आणि घराणेशाही संपवीत आहे .बुद्धांचा वारसाविषयक दृष्टीकोन अनुयायानी आचरणात आणावा, यातच सारणाचे मंगल आहे , असे डॉ डोंगरगावकर यावेळी म्हणाले.

सत्याग्रह कॉलेज खारघरच्या वतीने तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांची २५६४ वी जयंती ऑनलाईन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून साजरी करण्यात आली. दीक्षाभूमी नागपूर येथून पूज्य भदंत डॉ ज्ञानदीप महाथेरो यांनी सर्वाना त्रिशरण -पंचशील दिले.बुद्धजयंतीच्या कार्यक्रमाची प्रस्तावना अमरचंद हाडोळतीकर यांनी केले. प्रा. अनिल गायकवाड, प्रा. डॉ. निधी अग्रवाल, प्रा. व्यंकट माने यांनी बुद्धांच्या जीवनावर विचार मांडले. गायक संजय महाडिक यांनी भीम बुद्धांची गीते सादर केली.हर्षल शाक्य यांनी कविता सादर केली.

कोकण दर्पण

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »