पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : नवी मुंबई : पनवेल मधील बौद्ध लेणी आणि बौद्ध संस्कृतीचा खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सिडकोला धडा शिकवा, बौद्ध लेणी संवर्धन आणि संरक्षण आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन जागतिक ऐतिहासीक ठेवा जपा, असे आवाहन भूमिपुत्र नेते आणि बौद्ध लेणी संवर्धन समितीचे प्रमुख राजाराम पाटील यांनी केले आहे. मागील महिन्यापासून सिडको भवन येथे राजाराम पाटील यांनी आपले ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. सिडकोच्या चुकीच्या धोरणामुळे नवी मुंबई बाधित गावातील ११०० कुटुंब देखील न्यायापासून वंचित असल्याचे त्यांनी नमूद केले.
नवी मुंबई नियोजित विमानतळ हद्दीत प्राचीन अश्या केरुमाता बौद्ध लेणी आपली शेवटची घटका मोजत आहे. भारताला प्राचीन असा वैभवशाली इतिहास लाभलेला आहे. प्रियदर्शिनी सम्राट अशोक, गौतमीपुत्र सातकर्णी या आणि या सारख्या अनेक महान राज्यांनी केवळ बौद्ध धम्माचा स्वीकार करून जगाला जिंकले.. बौद्ध उपासक व उपासिका तसच बौद्ध भिक्खू ना राहण्यासाठी व धम्म अध्ययन व जगाला दुःख मुक्तीचा मार्ग दाखवण्यासाठी अनेक ठिकाणी लेण्या कोरल्या.. म्हणजेच आपल्या धम्माच्या पाऊलखुणा त्या कातळात उमटून ठेवल्या आहेत. आजही आपण केरुमाता बौद्ध लेणी वाचवत असताना त्याच पाऊलखुणा जपण्याचा प्रयत्न करत आहोत. सिडको आणि भांडवल दारांच्या घशात चाललेली आपली लेणी वाचवणं म्हणजे फक्त एक लेणी वाचवणं नाही. तर येणाऱ्या काळात सरकारला आणि प्रस्थापित अधिकार शाहीला मारलेली जोरदार चपराक असणार आहे. आजची एक लेणी उद्याचा संघर्ष थोडा कमी करू शकते.त्यामुळे सर्व समाजाने, बौद्ध समाजाने आता तरी जागे व्हावे आणि या लेणीसाठी एक होऊन सिडकोला आणि सरकारला जाब विचारावा, असे आवाहन राजाराम पाटील यांनी केले आहे.
कोकण दर्पण





