Press "Enter" to skip to content

भारतीय परंपराचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी – बीना गोगरी !

खारघरमधे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात साजरा !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : १४ फेब्रुवारी हा दिवस पाश्चात्य संस्कृतीनुसार जगभरात ‘वेलेन्टाईन डे ‘ च्या रूपाने प्रेमाचे पर्व म्हणून साजरा केला जातो. खारघर मधील शाश्वत फाऊंडेशन व अखिल भारतीय कच्छ कडवा पाटीदार युवा संघ या सामाजिक संस्थांनी पाश्चात्य संस्कृतीच्या आक्रमणाला आळा घालत भारतीय परंपरेनुसार १४ फेब्रुवारी हा दिवस ‘मातृ-पितृ पूजन दिवस ‘ म्हणून साजरा केला.
कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांचे पारंपरिक पद्धतीने पूजन करून त्यांना प्रेमाचे प्रतीक म्हणून भेटवस्तू देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला १५० हून अधिक ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती लाभली. शाश्वत फाऊंडेशनच्या अध्यक्षा बीना गोगरी यांनी सर्वांचे स्वागत केले व कार्यक्रमाचे उद्देश्य स्पष्ट केले. त्यानंतर दोन्ही संस्थांच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित महिला व पुरुषांचे पूजन केले. कार्यक्रमात एव्हरग्रीन युथ क्लब च्या ज्येष्ठ नागरिक सदस्यांनी गाणी गाऊन आपली कला सादर करत कार्यक्रमाचा उत्साह वाढवला. कार्यक्रमात १४ फेब्रुवारी २०१९ ला पुलवामा आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सी. आर. एस. एफ च्या वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. ह्या कार्यक्रमाला सेवानिवृत्त फौजी ज्येष्ठ नागरिकांची देखील उपस्थिती लाभली होती. अन्जु आर्या यांनी आलेल्या मान्यवरांचे आभार प्रदर्शन करत कार्यक्रमाची सांगता केली.
ज्येष्ठ नागरिकांचे पूजन करत असताना अनेक जण भारावून गेले होते. पाश्चात्य परंपरेला बळी न पडण्याचा व आपल्या संस्कृतीची जोपासना करण्याच्या ह्या प्रयत्नाचे सर्वांनी कौतुक केले व आयोजकांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यास स्मिता आचार्य, गीता पटेल, नीता गोगरी ह्यांचे सहकार्य लाभले.

चौकट :
“भारतीय परंपराचे रक्षण करणे व आपल्या युवा व बाल पिढीला पाश्चात्य संस्कृतीच्या विळख्यातून वाचवायचे असेल तर आपल्याला आता जागृत व्हावे लागणार आहे. भारत देशात प्रेम व त्यागाचे पहिले रूप आपले आई- वडिल च असतात म्हणून आम्ही हा सण ‘मातृ-पितृ पूजन दिवस ‘ म्हणून साजरा केला ” – बीना गोगरी (अध्यक्षा, शाश्वत फाऊंडेशन).

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »