Press "Enter" to skip to content

भाजप -शेकाप नगरसेवकांच्या राजकीय संघर्षात बौद्ध प्रार्थना स्थळ रडारवर ! खारघर येथील बौद्धबांधव आक्रमक !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : पनवेल महानगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक निलेश बाविस्कर आणि शेकापचे स्वीकृत नगरसेवक गुरुनाथ गायकर यांच्यातील जुन्या राजकीय संघर्षामुळे खारघर येथील बौद्धांचे प्रार्थना स्थळ असलेले पंचशील बुद्धविहार सिडको कारवाईच्या रडारवर आहे.

सदर बुद्धविहारावर कारवाई करण्याची मागणी शेकापचे स्वीकृत नगरसेवक गुरुनाथ गायकर यांनी सिडकोकडे केली असल्याची माहिती बुद्धविहार टस्टचे अध्यक्ष संतोष सोनकांबळे यांनी पत्रकारांना दिली. सदर प्रकरणामुळे खारघर येथील बौद्धबांधवांमध्ये असंतोष पसरला आहे. दरम्यान, गुरुनाथ गायकर यांच्याविरोधात विश्व पंचशील बौद्ध चॅरिटेबल ट्रस्टने शेकापचे नेते आमदार बाळाराम पाटील यांच्याकडे तक्रार करीत गायकर यांच्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आमदार प्रशांत ठाकूर, महापौर कविता चौतमल, उपमहापौर जगदीश गायकवाड, पोलीस सहायुक्तांना यांना देखील लेखी निवेदन देण्यात आल्याचे संतोष सोनकांबळे यांनी सांगितले.

आमच्या समाजासाठी धावणारे सर्वच लोकप्रतिनिधी आमचे आहेत. बुद्ध विहार हे बौद्ध समाजाचे प्रार्थना स्थळ असून तुमच्या राजकारणात आमचे प्रार्थना स्थळ आणू नका, याविरोधात निरर्थक केलेली तक्रार तात्काळ मागे घ्यावी, अन्यथा खारघमध्ये तीव्र निषेध मोर्चा काढण्याचा इशारा बौद्ध बांधवानी दिला आहे. याबाबत बुद्धविहार शिष्ट मंडळ सोमवारी खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार यांची भेट घेणार असल्याची माहिती अध्यक्ष संतोष सोनकांबळे यांनी पत्रकारांना दिली.

दरम्यान, गुरुनाथ गायकर यांनी आपण बुद्धविहाराबाबत तक्रार केली नसल्याचे म्हटले आहे. पंचशील बुध्दविहारात असलेले कार्यालय भाजप नगरसेवक निलेश बाविस्कर यांनी वापरण्यावर आपला आक्षेप असल्याचे गायकर यांनी सांगितले. खारघर शहरात फुटपाथ आणि अन्य सार्वजनिक ठिकाणी बेकायदा असलेल्या सर्वच पक्ष कार्यालयांवर आणि अतिक्रमणावर कारवाई करण्याची मागणी आपण सिडकोकडे केली असल्याचे गायकर यांनी सांगितले.

पंचशील बुद्धविहार हे विश्व पंचशील बौद्ध चॅरिटेबल ट्रस्टद्वारा २००७ साली खारघर सेक्टर १५ मध्ये बांधण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने २००९ पूर्वीच्या धर्मस्थळांना अभय दिले आहे. बुद्धविहार परिसरात कार्यक्रमासाठी बाहेरून आलेल्या बौद्ध भिक्कूनसाठी बसण्यासाठी कार्यालय बनविण्यात आला आहे. सदर बुद्धविहार हे पनवेल महापालिका क्षेत्रातील प्रभाग सहामध्ये आहे. भाजपचे निलेश बाविस्कर हे तेथील स्थानिक नगरसेवक आहेत. मागच्या महिन्यात परिसरातील नागरिकांना पनवेल महापालकेच्या माध्यमातून कचराकुंडी देण्याचा कार्यक्रम बुद्धविहार परिसरात घेण्यात आला. मात्र, बुद्धविहार म्हणजे भाजप नगरसेवकाचे कार्यालय असल्याचा समज धरून शेकापचे स्वीकृत नगरसेवक
गुरुनाथ गायकर यांनी बुद्धविहाराविरोधात सिडको प्रशासनाकडे तक्रार केल्याचे विश्व पंचशील बौद्ध चॅरिटेबल ट्रस्टद्चे म्हणणे आहे. तसे लेखी निवेदन ट्रस्टचे अध्यक्ष संतोष सोनकांबळे यांनी आमदार बाळाराम पाटील यांना दिले आहे. बुद्धविहार हे प्रार्थना स्थळ आहे , ते माझे कार्यालय नाही. मी स्थानिक लोकप्रतिनिधी असल्याने सर्वच समाजात माझा वावर असतो, मात्र गुरुनाथ गायकर यांनी राजकीय सुड घेण्यासाठी बुद्धविहाराचा विषय मध्ये आणल्याचे नगरसेवक निलेश बाविस्कर यांचे म्हणे आहे.

दरम्यान, खारघर मध्ये अनेक प्रार्थना स्थळे आहेत. २००९ सालानंतर बांधलेली अनेक प्रार्थनास्थळे सिडकोने अनधिकृत ठरवलेली आहेत. त्यावर अनेकदा कारवाई देखील केली आहे. अनेक बेकायदा बांधलेली प्रार्थनास्थळे हि राजकीय वरदहस्तामुळे कारवाई नंतरदेखील पुन्हा बांधली जातात. भविष्यात खारघर शहरात अतिक्रमणाला आळा बसविण्यासाठी सिडको आणि पनवेल महापालिकेने ठोस पावले उचलावीत अशी मागणी खारघरवासियांनी केली आहे.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »