Press "Enter" to skip to content

`नवी मुंबई कला क्रीडा महोत्सव २०२०` जल्लोषात शुभारंभ ! आमदार मंदाताई म्हात्रे यांचा पुढाकार !

नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था व सिडको यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सव-२०२० चा शुभारंभ सोहळा जल्लोषात पार पडला. सदर महोत्सवाचे उदघाटन नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या शुभ हस्ते सीबीडी बेलापूर येथील सुनील गावस्कर मैदान येथे संपन्न झाले. बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे गेली २४ वर्षापासून सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्यक्रमाबरोबर येथील कलाकार,विद्यार्थी व महिला यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा याकरिता नवी मुंबई कला क्रीडा महोत्सवाचे आयोजन करीत असतात. त्यांचे हे समाजकार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार अण्णासाहेब मिसाळ यांनी नवी मुंबई सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी व्यक्त केले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, महामंत्री डॉ. राजेश पाटील, विजय घाटे, मारुती भोईर, नगरसेवक अशोक गुरखे, सुनील पाटील, दीपक पवार, माजी परिवहन सभापती साबू डॅनियल, संपत शेवाळे, विक्रम पराजुली, कमल शर्मा, नरेंद्र गिल, नारायण मुकादम, दि.ना.पाटील, मधुकर पाटील दत्ता घंगाळे, अमित पाटील, नितीन कंधारी, उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार व्यासपीठावर उपस्थित होते. सदर महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी सायली आर्ट झोन आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम तसेच प्रसिद्ध लावणी कलावंत अश्मिक कामठे यांच्या लावणीचा कार्यक्रम सादर करण्यात आला.

यावेळी माजी परिवहन सभापती साबू डॅनियल यांनी सांगितले की, आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून दरवर्षी कार्याक्रमाचे आयोजन केले जाते. त्या सीबीडी परिसरात राहत असल्याने नेहमी मला त्यांचे सहाय्य लाभते. १० दिवसांच्या या महोत्सवामुळे सीबीडी-बेलापूर येथील नागरिकांना कार्यक्रमाची मेजवानी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. पंजाब कल्चरल असोशिएशनचे अध्यक्ष कमल शर्मा यांनी सांगितले कि, एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचा आनंद सीबीडी येथील नागरिकांना नि:शुल्क घेता यावा यासाठी आमदार मंदाताई यांच्या माध्यमातून गेली २४ वर्षे हा उपक्रम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्या 30 वर्षापूर्वी जशा होत्या आजही त्यांचा जोश कायम असल्याचेही त्यांनी सांगितले.

    यावेळी जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी सांगितले कि, पहिले गावागावात जत्रा भरली जात असे. परंतु आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून शहरी भागात १०  दिवस जत्रा भरविली जाते. या माध्यमातून सामाजिक वारसा जपणाऱ्या पहिल्या आमदार मी पाहिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.  आमदार सौ. मंदाताई म्हात्रे आमदार झाल्यानंतर त्यांनी लावलेल्या कामांचा धडाका सर्व नागरिकांना माहित  आहे. मी त्यांचे काम अगदी जवळून पाहिले आहे. कोणीही व्यक्ती त्यांच्याकडे गेल्यास त्वरित ते काम मार्गी लावण्याचा त्यांचा उद्देश असतो. जी कामे गेली अनेक वर्षे प्रलंबित होती, जी कामे होणेच अशक्य होती, जी कामे करणे रथी महारथींना जमले नाही अशी कामे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी फक्त पटलावरच आणली नाहीत तर ती मार्गी लावली. ग्रामस्थांच्या घरांचा प्रश्न असो कि, शहरातील नागरिकांच्या घरांचा प्रश्न, झोपडपट्टी येथे राहणाऱ्या गरीब जनतेच्या घरांचा प्रश्नहि त्यांनी शिताफीने सोडविला. हि सर्व केलेली कामे तसेच अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांना एकत्र आणण्याच्या त्यांच्या कामामुळे त्या पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून आल्याचे रामचंद्र घरत यांनी सांगितले.

यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले कि, श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेच्या माध्यमातून गेल्या २४ वर्षापासून हा उपक्रम सुरु आहे असून, महिलांना एकत्रित आणून त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम सदर संस्था करीत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने वा सिडकोने सदर संस्थेला भूखंड उपलब्ध करून दिल्यास महिलांना सक्षम होण्याकरिता संधी उपलब्ध होऊ शकतील. तसेच मागील आठवणींना उजाळा देत बेलापूर विधानसभा क्षेत्रातील मतदारांनी जे प्रेम मला दिले आहे, ते कदापि विसरू शकणार नसल्याचे मत आमदार मंदाताई म्हात्रे यांनी व्यक्त केले. या सीबीडी बेलापूर मध्ये धबधबा असून सदर क्षेत्र विकसित केल्यास बेलापूर एक पर्यटन क्षेत्र म्हणून नावारूपास येणार असल्याचे सांगत आज महोत्सवात हळदी-कुंकू च्या निमित्ताने हजारो महिला दिसत असल्या तरी उद्या लावणी कार्यक्रम असल्याने हजारो पुरुष मंडळी दसणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे उदघाटक नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सांगितले कि, स्वच्छता ही काळाची गरज आहे. आणि त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न महापालिकेच्या वतीने करण्यात येतील असे मत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना एक हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे याद्वारे त्या आपल्या कला नागरिकांसमोर सादर करू शकतात. गेली २४ वर्षे सदर कार्यक्रम अविरतपणे सुरु आहे, त्याबद्दल त्यांनी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांचे अभिनंदन करत यापुढेही असे कार्यक्रम होत राहावेत याकरिता शुभेच्छा दिल्या.

शनिवार दि. १८ जानेवारी पासून ते २६ जानेवारी २०२० या दरम्यान श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था व सिडको यांच्या संयुक्त विद्यमाने सी.बी.डी. बेलापूर येथे नवी मुंबई कला क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून सदर महोत्सवात आरोग्य शिबीर, नाट्य, संगीत, चित्रकला, पाककला, मेहंदी स्पर्धा अशा विविध स्पर्धेचे तसेच सदाबहार लावण्यांचा नृत्य जल्लोष लावणी महोत्सव, आम्ही दोघे राजा-राणी पैठणीच्या खेळांची स्पर्धा, जुन्या नव्या हिंदी गाण्यांचा सदाबहार कार्यक्रम यादो की बारात ऑर्केस्ट्रा, कॉमेडी एक्स्प्रेस, महामानवांना अभिवादन देशभक्ती गीतांचा कार्यक्रम, रंग मराठी सणांचे अशा विविध कार्यक्रमाची मेजवानी नागरिकांना मिळणार आहे. गुरुवार दि. 23 जानेवारी २०२० रोजी जगप्रसिद्ध गीतकार, संगीतकार, गायक पदमश्री शंकर महादेवन यांची प्रमुख उपस्थिती असणार असून त्यांच्या शुभहस्ते बेलापूर विधानसभा क्षेत्रातील विविध क्षेत्रात कला सादर करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात येणार आहे. रविवार दि. २६ जानेवारी २०२० रोजी सकाळी ९ ते २ महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून सदर शिबिरात मोफत औषधे व चष्मे वाटप करण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी मराठमोळ्या सण व उत्सवांचे मनोहारी दर्शन घडविणारा नृत्यात्मक कार्यक्रम “” कार्यक्रमाने सदर महोत्सवाची सांगता होणार आहे. सदर महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल नागरीकांना अनुभवयास मिळणार असून या कार्यक्रमाकरिता निशुल्क प्रवेश असणार आहे. सदर महोत्सवात येणाऱ्या महिलांकरिता लकी ड्रॉ द्वारे रोज एक पैठणी बक्षीस स्वरुपात देण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव निलेश म्हात्रे यांनी दिली.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »