गृहनिर्माण प्रकल्पाविरोधात नगरविकास मंत्र्यांना साकडे !
बस आणि ट्रक टर्मिनल्सवरील इमारती दुसरीकडे बांधाव्यात !
शिवसेनेचे महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांची मागणी !
पनवेल,कोकण दर्पण वृत्तसेवा : खांदेश्वर, मानसरोवर, खांदा वसाहत आणि आसुडगाव येथील बस आणि ट्रक टर्मिनल्सच्या जागेवर उभारण्यात येत असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पाला रहिवाशांकडून विरोध करण्यात आला आहे. याविरोधात लढा पुकारण्यात आला आहे. याविषयी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरूवारी भेट घेतली. पंतप्रधान आवास योजनेर्तंगत बांधण्यात येणाऱ्या इमारती दुसऱ्या ठिकाणी बांधण्यात याव्यात अशी मागणी महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांनी केली आहे. याबाबत लवकरच बैठक बोलावून योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे नगरविकास मंत्र्यांनी सांगितले.
खांदेश्वर रेल्वस्थानकासमोर सेक्टर 28 येथील मोकळया भूखंडावर सिडकोने खांदेश्वर प्लाझा बांधण्याचे नियोजन केले होते. त्यासाठी शंभर कोंटीपेक्षा जास्त तरतुद करण्यात आली होती. मात्र हा प्रकल्प रद्द करून तिथे पंतप्रधान आवास योजनेर्तंगत इमारती बांधण्यासाठी पत्रे लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर मानसरोवर रेल्वेस्थानकासमोरही असा गृहप्रकल्प बांधण्यात येत आहे. खांदा वसाहतीत बस टर्मिनल्सच्या जागेवर इमारती उभारण्यात येत आहेत.तर आसुडगाव येथे ट्रक टर्मिनल्स खाली आणि वरती पंतप्रधान आवास योजना साकरण्यात येणार आहे. हा प्रकल्प व्हावा पण दुसऱ्या जागेवर अशी मागणी रहिवाशी, सामाजिक संस्थांनी केली आहे.याविरोधात शिवसेनेने सुरूवातीपासून आवाज उठवला आहे. दोन दिवसापुर्वी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले होते. गुरूवारी सेनेचे रायगड जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांच्यासह रामदास शेवाळे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि जनतेचा या प्रकल्पाला असलेला विरोध त्याचबरोबर सिडकोच्या मनमानी धोरणाबाबत माहिती दिली. त्यांना निवेदन सुध्दा देण्यात आले. मुख्यमंत्र्याच्या आदेशानुसार लवकरच बैठक बोलावून याबाबत जनहिताचा निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.
चौकट
विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या मागण्याबाबतही निवेदन रायगड
जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्तांचे बेलापुर येथे सुरू असलेल्या आंदोलनाबाबतही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना माहिती दिली. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्याबाबत सिडकोला योग्य ते निर्देश देण्याची मागणी त्यांनी केली.
कोकण दर्पण .





