पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : पनवेल महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी भाजप मित्रपक्ष युतीच्या उमेदवार डॉ. कविता चौतमोल तर उपमहापौर पदासाठी जगदिश गायकवाड यांनी आज (दि.०७) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मुळात पनवेल महपौर पदाच्या अडीच वर्षाचा कार्यकाळ संपुष्ठात आल्यानंतर पुढील अडीज वर्षाचे महापौर पद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाले होते. त्यामुळे पनवेल महापालिकेतील सत्ताधारी भाजपमधील इच्छुक महिला नगरसेवकांच्या अशा पल्लवित झाल्या होत्या. तब्बल दहा इच्छुक उमेदवारांनी भाजपचे नेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्याकडे
मागणी केली होती. खारघर मधील इच्छुक उमेदवारांनी तर जोरदार फिल्डिंग लावली होती. मात्र , भाजपने पुन्हा मावळत्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांना पुन्हा संधी दिल्याने इच्छुकांची पुरती निराशा झाली आहे.
पनवेल महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी भाजप मित्रपक्ष युतीच्या उमेदवार म्हणून डॉ. कविता चौतमोल यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, शहराध्यक्ष जयंत पगडे, सभागृहनेते परेश ठाकूर, माजी उपनगराध्यक्ष संदीप पाटील, स्थायी समिती सभापती प्रविण पाटील यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.
पनवेल महापालिकेची स्थापना १ ऑक्टोबर २०१६ रोजी झाली. पनवेलच्या पहिल्याच निवडणुकीत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ७८ नगरसेवकांपैकी ५१ नगरसेवक जिंकून पनवेल महापालिकेवर विजयाचा झेंडा रोवला. १० जानेवारी रोजी ही निवडणूक होणार असून निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी निवडणुकीचे काम पाहणार आहेत. या महापालिकेत ७८ पैकी ५१ नगरसेवक भाजप मित्रपक्ष युतीचे आहेत. शेकापनेही या पदांसाठी आपला उमेदवार दिला आहे. पक्षीय बळाबल पाहता भाजप युतीचे पारडे अधिक जड आहे, त्यामुळे १० जानेवारीला पुन्हा एकदा डॉ. कविता चौतमोल महापौर म्हणून तर जगदिश गायकवाड उपमहापौरपदावर विराजमान होणार आहेत, त्यामुळे फक्त औपचारिकता बाकी आहे.
कोकण दर्पण.





