खारघर, कोकण दर्पण वृत्तसेवा : आम्ही जिजाऊंच्या लेकी, आम्ही सावित्री, भिमाई आणि रमाईच्या लेकी आहोत, आम्हांला कोणाची भीती ? असे म्हणत महिलांच्या नेत्या आणि पनवेल महापालिका महिला व बालकल्याण समिती सभापती लीना अर्जुन गरड यांनी खारघर मधील महिलांमध्ये मोठा आत्मविश्वास निर्माण केला. निमित्त होते दैनिक दिव्य मराठीच्या वतीने राज्यभर आयोजित केलेल्या अंधारावर चालून जाणार रातरागिनी या कार्यक्रमाचे.
आज संपूर्ण देशामध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. यंत्रणा तोकडी पडते आहे आणि महिलांमध्ये भयावह स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मी माझे रक्षण करायला समर्थ आहे, हा विश्वास सामान्य महिलेमध्ये, मुलींमध्ये निर्माण करणे गजेचे आहे. सामाजिक जनजागृतीचा हाच उद्देश डोळ्यापुढे ठेवून दैनिक दिव्य मराठीने संपूर्ण महाराष्ट्रभर या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कामावरून घरी उशिरा परतणाऱ्या महिलांमध्ये अथवा मुलींमध्ये आत्मबळ वाढावेहा एकमेव उद्देश यामागे होता.
सामाजिक दायित्वाचा हा उद्देश साध्य करण्यासाठी खारघर मध्ये लीना गरड यांनी पुढाकार घेतला. खारघर शिल्प चौक ते उत्सव चौक असा नाईट वॉक घेण्यात आला. या मध्ये दोनशे हुन अधिक महिलांनी सहभाग नोंदविला. महिला सुरक्षा, महिला सबलीकरण आणि सामाजिक संदेश देणाऱ्या घोषणा देत मध्यरात्री १२ वाजता या नाईट वॉकचा समारोप झाला.
यावेळी लीना गरड यांनी महिलांना मार्गदर्शन केले. महिलांकडे वाईट नजरेने पाहणाऱ्याच्या कानाखाली वाजवून त्याला अद्दल घडविण्याची वेळ आली असून आपण स्व रक्षणासाठी सज्ज होऊया असा संदेश यावेळी लीना गरड यांनी दिला.
कोकण दर्पण





