Press "Enter" to skip to content

शिक्षणातील आव्हाने समजून घेणे आवश्यक – प्रा.जान्हवी साल्पेकर

शिक्षणातील आव्हाने समजून घेणे अत्यावश्यक आहे, त्यातून भविष्यातील शिक्षण प्रणालीचा पुढील प्रवाह निश्चित करता येतो.

शिक्षणप्रणाली आखताना विद्यार्थी हा चांगला नागरिक, विज्ञाननिष्ठ आणि अखंड ज्ञानलालसा असलेला असावा अशी उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवली जातात. ही उद्दिष्टे जरी समान राहत असली तरी कालानुरूप शिक्षणप्रणालीमध्ये नवे प्रवाह येतात, काही बदल घडून येतात. शिक्षणप्रणालीमध्ये विषयांची संख्या, आशयाची मांडणी, अध्यापन पद्धती, अध्ययन तंत्र यामध्ये कालपरत्वे कोणते बदल झाले आहेत आणि भविष्यात कोणते प्रवाह येण्याची शक्यता आहे.
ई-लर्निग येऊ घातलेल्या नवीन प्रवाहात प्रामुख्याने माहिती तंत्रज्ञानाचा प्रभाव विशेषत्वाने जाणवू लागला आहे. एज्युसॅट उपग्रहाद्वारे आणि व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारा शिक्षण देण्याची यंत्रणा भारतासारख्या देशांमध्ये मोठय़ा भूभागावर पसरलेल्या आणि प्रचंड प्रमाणात असलेल्या लोकसंख्येला शिक्षण देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. पण अशा प्रकारची अध्यापन पद्धती खेड्यांमध्ये कशी अवलंबली जाईल हा मोठा प्रश्न आहे. खेडोपाडी विजेची उपलब्धता आणि विजेचा देशभर अखंडित प्रवाह या दोन आव्हानांना आपल्याला सामोरे जावे लागणार आहे.
सध्याच्या शिक्षणप्रणालीमध्ये जे विषय हाताळावे लागतात त्यापेक्षा कितीतरी जास्त विषय भविष्यात हाताळावे लागतील. यासाठी अध्यापन पद्धतीमध्ये क्रॉस कल्चिरग आणावे लागेल. उदाहरणार्थ, वैद्यकशास्त्राच्या विद्यार्थ्यांला संगणकशास्त्रामध्ये पारंगत व्हावे लागेल, बायोटेक्नॉलॉजीमध्ये व्यवस्थापनशास्त्र शिकावं लागेल, त्याचप्रमाणे संशोधन करताना एकस्व अधिकाराचे न्यायशास्त्र शिकावे लागेल.
एकमेकांशी थेट संबंधित नसलेले दोन विषय एकत्रितपणे शिकण्याची सोय नवीन शिक्षणप्रणालीमध्ये उपलब्ध करण्याची गरज आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढावी म्हणून अनेक पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. पण तरीसुद्धा शैक्षणिक गुणवत्ता वाढल्याचं आढळत नाही. किंबहुना दिवसेंदिवस शैक्षणिक गुणवत्ता घसरतच चालल्याचं आढळतं आहे. गुणवत्तावाढीसाठी शिक्षक आणि संशोधकांना राजकारणविरहित वातावरण आणि भ्रष्टाचारमुक्त व्यवस्थापन प्रगत राष्ट्रांमध्ये उपलब्ध करून दिलं जातं. अशी प्रणाली आपल्या देशात विकसित करणे आणि कार्यान्वित करणे हे आपल्यासमोरचं अत्यंत कठीण आव्हान आहे.
आज आपला विद्यार्थी प्रयोगशाळेपासून दूर आहे. सूक्ष्मदर्शक यंत्र, दुर्बीण, प्रोजेक्टर ही साधने शाळेतल्या शोकेसमध्ये शोभेच्या वस्तू म्हणून ठेवल्या जातात. प्रयोगशाळा ही शाळेतली अडगळीची खोली म्हणून वापरली जाते. शिक्षकांची मानसिकता ही आमच्या अध्यापन पद्धतीसमोरचं मोठं आव्हान आहे. भविष्यात प्रायोगिक शिक्षणावर प्रचंड भर द्यावा लागेल.
थायलंडमधील एका ब्रिटिश शाळेत अभ्यासक्रमाची आखणीच अशी केली आहे की, आटोपशीर अभ्यासक्रम, कमी विद्यार्थिसंख्या आणि भरपूर वेळ हे या अभ्यासक्रमाचे सूत्र आहे. एकच प्रकरण जवळजवळ तीन महिने विविध अंगांनी शिकविले जाते. त्या प्रकरणाची सद्धांतिक मीमांसा, संकल्पना चित्र, लहान लहान प्रकल्प आणि उपक्रम, संबंधित संस्थांना भेटी, प्रायोगिक पडताळा, निरीक्षणांवर आधारित निष्कर्ष, शिक्षकांशी इंटरनेटच्या माध्यमातून हवा तेव्हा संवाद साधण्याची सोय आणि या सगळ्या पद्धती लक्षात घेऊन त्यानुसार प्रश्नपत्रिकेचे स्वरूप निश्चित करून त्यानुसार परीक्षा घेतली जाते. यामध्ये पाठांतर, कॉपी, गाइड इत्यादी गोष्टींना कुठेच स्थान नाही.
वर्गाच्या चार भिंतीच्या बाहेर जाऊन शिक्षणाचे काही धडे गिरवणे हे प्रगत राष्ट्रात अनिवार्य केलेले आहे. क्षेत्रभेटी, अचानक उद्भवलेल्या परिस्थितीशी सामना करण्याचे कौशल्य, साहसी खेळ, संवाद कौशल्य, नेतृत्व गुणांचा विकास, एकत्रितपणे काम करण्याची मानसिकता, शारीरिक व बौद्धिक क्षमतांचा विकास असे अनेक विषय या अध्ययनतंत्रात समाविष्ट केलेले आहेत. अमेरिकेतील केनेडी स्पेस सेंटरमध्ये अशा पद्धतीने दिलेले जाणारे शिक्षण पाहून सर्वच वयोगटांतील मंडळी स्तिमित होतात. भविष्यात भारतातल्या ‘इस्रो’ या संस्थेला अशा प्रकारच्या सुविधा निर्माण कराव्या लागतील. तरच भारतात अंतराळवीर तयार होतील.
प्रगत राष्ट्रांमध्ये संशोधन प्रकल्पसुद्धा तावूनसुलाखून घेतले जातात. या संशोधनाला आíथक साहाय्य प्राप्त होईल अशा दर्जाचे संशोधन असावे लागते. संशोधनाला मिळणाऱ्या आíथक प्राप्तीमधूनच शास्त्राचा पगार दिला जातो. या सगळ्या प्रक्रियेसाठी एक करार केला जातो. करार ठरावीक मुदतीचा असतो. म्हणजेच, ठरावीक कालावधीत संशोधनाचे निष्कर्ष मिळणे बंधनकारक असते. भविष्यात भारतातील शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातील नोक ऱ्यासुद्धा करार पद्धतीच्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. चांगले परिणाम न दाखवल्यास हकालपट्टी अटळ असेल. ‘हायर अँड फायर’ची ही परदेशी संकल्पना आपल्या शिक्षणप्रणालीचा भाग बनेल.
आज आपल्या बहुतांश विद्यापीठांकडे नजर टाकल्यावर असे आढळते की, ही विद्यापीठे परीक्षा घेणारी केंद्रे बनली आहेत. विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रम शिकवण्याबरोबरच संशोधनकार्यसुद्धा होणं गरजेचं आहे. भविष्यातली विद्यापीठे ही ‘संशोधन उद्योग केंद्र’ म्हणून उदयाला येतील. ही केंद्रे त्या परिसरातील कारखान्यांचे, शेतक ऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मदत करतील.
आपल्या देशाचा विचार केला तर शिक्षण पद्धतीमध्ये होऊ घातलेले आमूलाग्र बदल हे दुर्दैवाने तंत्रज्ञानाशी जोडले जाताहेत. खरंतर हे बदल शिक्षणप्रक्रियेशी संबंधित असलेल्या मानव संसाधनांशी जोडले जायला हवेत. या ‘बदल’ प्रक्रियेत विद्यार्थी, शिक्षक आणि इतर समाज यांची मानसिकता बदलण्याची तरतूद असायला हवी. आज विद्यार्थी वर्गात का बसत नाहीत? शिक्षकाला आपल्या विषयाचं सखोल ज्ञान का नसतं? उपग्रहाद्वारे देण्यात येणाऱ्या शिक्षणप्रणालीला म्हणावा तेवढा प्रतिसाद का मिळत नाही? असे प्रश्न खऱ्या विचारवंताला अस्वस्थ करतात. विद्यार्थी, शिक्षक आणि समाज या तिन्ही घटकांमधले परस्परसंबंध ज्ञानार्जनासाठी पोषक राहिले नसल्याने असे प्रश्न उद्भवतात.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, शिक्षण व्यवसायाभिमुख असायला हवं, हे जरी खरं असलं तरी या दृष्टिकोनाचा अतिरेक करू नये. शिक्षणाचा संबंध थेट नोकरीशी किंवा पोटापाण्याचा प्रश्न सोडवणाऱ्या व्यवसायाशी जोडून आपण मोठी चूक करतो आहोत. केवळ नोकरी मिळवण्यासाठी शिक्षण नको तर शिक्षण ही ज्ञानप्राप्तीची किंवा व्यक्तीच्या सर्वागीण विकासाची प्रक्रिया असायला हवी, ज्या समाजाने, ज्या देशाने हे तत्त्व स्वीकारले तोच समाज, तोच देश नवनिर्मिती करू शकतो .

प्रा. जान्हवी साल्पेकर

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »